‘तुलना’ तरुणांना आवडत नाही

अल्पशिक्षित पालक आणि कुटुंबाची बेताची आर्थिक स्थिती असेल तर असे पालक मुलांबाबत हिंस्त्र बनताना दिसतात. मात्र, मग मुलेही तेच वागणे प्रतिबिंबित करतात आणि मग एक नवीनच मानसिक स्थिती बनते, तीही ऐन पौंगडावस्थेत…

मानसी चांदोरीकर

माने काका स्वतःहून भेटायला आल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. माने काका एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्यावर कामाला होते. ते त्यांच्या धाकट्या मुलाबद्दल म्हणजे अतुलबद्दल बोलायला आले होते.

“”अतुल आता खरं तर 26 वर्षांचा आहे पण तो खूपच अबोल आणि शांत आहे. घरात फारसा कोणाशी बोलत नाही. एकटा एकटा असतो. बाहेरही त्याचे फारसे मित्र नाहीत. एक-दोन जवळचे मित्र आहेत तेवढेच लहानपणी अतुल खूप बोलका आणि आनंदी होता. त्याच्या मोठ्या भावाबरोबर त्याचं खूप पटायचं. पण तो जसा जसा मोठा होत गेला तसा तो गप्प गप्प आणि अबोल होत गेला. एकटा एकटा रहायला लागला. त्याला काही अडचण आली तर आम्ही त्याला दादाची मदत घ्यायला सांगायचो. पण त्याला ते अजिबात आवडायचे नाही. त्याला राग यायचा खरं तर आमचा मोठा खूपच हुशार आहे. शाळेत नेहमी पहिल्या पाचात यायचा पण अतुल तसा नाही.

अभ्यासात जरा कच्चाच आहे पहिल्यापासून. पण दादाची मदत घे सांगितलं की त्याला खूप राग येतो. सध्या तो नोकरी शोधतोय. त्याला हवी तशी नोकरी मिळत नाहीये. त्याचा दादा म्हणतोय माझ्या कंपनीत ये पण हा पठ्ठया काही जायला तयार नाही. त्याला म्युझिक आवडतं आणि त्याला त्यातच करिअर करायचंय. आता तुम्हीच सांगा दादा एवढा हुशार कर्तबगार त्याला चांगली मदत करतोय तर याने मदत नको घ्यायला का? घरात एकदम शांत असतो. कोणाशी मनमोकळेपणाने बोलतही नाही.

आम्ही काय करायचं? सतत स्वतःच्या खोलीत बसलेला असतो. आता याने नोकरी नको करायला का? म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी वेळेत पार पडतील. आता तुम्हीच समजवा त्याला.” काकांचं बोलून झाल्यावर त्यांच्याकडून इतर महत्त्वाची कौटुंबिक माहिती घेतली व पुढच्या वेळी अतुलला घेऊन येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे काका अतुलला घेऊन आले. अतुलने स्वतःची छान ओळख करून दिली त्यातून असे लक्षात येत होते की त्याला म्युझिकची मनापासून आवड आहे आणि त्याला त्यातच करिअर करण्याची इच्छा आहे. पण या व्यतिरिक्त विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे तो मोकळेपणाने देत नव्हता.

त्यामुळे पुढील सत्रात त्याला एकट्याला भेटायला बोलावले. त्याप्रमाणे तो आला. या सत्रात तो अतिशय मोकळेपणाने बोलला. कारण या सत्रास तो एकटाच आला होता. “”मॅडम लहानपणापासून सतत माझी तुलना दादाशी होत आली आहे. मला नाही आवडत हे मी काही करायला गेलो की सतत मला त्याच्या हुशारीची उदाहरणे दिली जातात. प्रत्येकच बाबतीत मी कसा कमी आहे हे मला दाखवले जात. मला आता खरंच असं वाटायला लागलंय की मला काहीच जमत नाही.

मला आता कोणतेच प्रयत्न करायचे नाहीत. अतुलच्या या बोलण्यातून दादाशी होणारी “तुलना’ ही त्याची समस्या असल्याचे लक्षात आले. त्याबाबतीत आवश्‍यक ते मार्गदर्शन त्याला करून नव्याने प्रयत्न सुरू करण्यास पुढील काही सत्रात त्याला प्रेरणा देण्यात आली. तसेच त्याची समस्या दूर करण्यासाठी त्याच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील कौटुंबिक समुपदेशन करण्यात आले.
समुपदेशनानंतर पालकांनी देखील अतुल व दादाची तुलना बंद करून अतुलला त्याच्या आवडत्या क्षेत्रात काम करायला खूप प्रेरणा दिली. दादानेदेखील पुढाकार घेऊन या साऱ्यात अतुलची खूप मदत केली. “तुलना’ थांबल्यामुळे अतुलचे व्यक्तिमत्वदेखील खुलत गेले. आणि तो स्वतःच्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी झाला याची समस्या आपोआपच सुटली.
(केसमधील नावे बददली आहेत.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)