पुणे- येरवडा कारागृहातील तुरुगांधिकाऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. निलेश ऊर्फ तात्या संभाजी वाडकर (वय 34, रा. जनता वसाहत, विठ्ठल मंदिरामागे, दत्तवाडी), कुणाल नितीन कानडे (वय 25, रा. शास्त्री चौक, भोसरी), ऋषीकेश राजेश चव्हाण (वय 19, रा. खोपडेनगर, कात्रज) आणि ओंकार चंद्रकांत बेलुसे (वय 19, रा. पर्वती पायथा, दत्तवाडी), अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. तुरूंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर दि. 6 जुलै रोजी सकाळी गोळीबार झाला होता. घटनेच्या दिवशी पाटील हे निवासस्थावरून पायी कारागृहाकडे कर्तव्यासाठी चालले होते. त्यावेळी विश्रांतवाडीकडून दुचाकीवरून कारागृहाच्या दिशेने निघालेल्या दोघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांचा निशाना चुकल्याने अधिकारी थोडक्‍यात बचावले. छत्रीच्या सहाय्याने प्रतिकार केल्याने दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी पुंगळी जप्त केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. याप्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ऍड. महेश झंवर आणि ऍड. सचिन स्वामी यांनी चौघांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, नव्वद दिवसात वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने पोलिसांनी चौघांना जामिन मंजूर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)