तुम्ही पण कानात तेल घालता का? मग हे नक्की वाचा 

डॉ. संजय गायकवाड 
ऐकू कमी येत असल्याच्या तक्रारी सध्या अनेक जण करत असतात. 20 ते 40 या वयोगटातील जवळपास 80 टक्‍के लोकांना अलीकडे कमी ऐकू येऊ लागले आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे ऐकण्याची समस्या निर्माण झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोबाइलच्या अतिवापराबरोबरच कानाचे आरोग्य बिघडण्यास आणखीही काही घटक जबाबदार असतात. त्याची माहिती आपण घेऊ. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली जीवनशैली अलीकडच्या काळात आमूलाग्र बदलली आहे. चारचाकी आणि दुचाकींच्या वाढत्या संख्येमुळे ध्वनिप्रदूषणाची पातळी कमालीची उंचावली आहे. ध्वनिप्रदूषण वाढल्यामुळे कानाचे आरोग्य बिघडू लागले आहे. तरुण मंडळींमध्ये कानाच्या समस्या असण्याचे प्रमाण मोठे आहे. तरुण वयात या समस्या जाणवाव्यात हे चिंताजनक आहे. तरुणवयात शरीराची प्रतिकारशक्‍ती चांगली असते.
असे असतानाही तरुणांना कानाच्या समस्या जाणवत आहेत. देशातील एकूण लोकसंख्येच्या 20 ते 22 टक्‍के लोकांना कानाच्या कोणत्या ना कोणत्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. कान दुखणे, ऐकू कमी येणे, कानातून आवाज येणे, कान सुजणे, कानात दडे बसणे अशा प्रकारच्या तक्रारी रुग्णांकडून ऐकायला मिळतात. याचबरोबर कानातून द्रवपदार्थ बाहेर येत असल्याच्या तक्रारीही रुग्णांकडून केल्या जातात. वातावरणात शांतता असतानाही कोणते ना कोणते आवाज ऐकू येणे ही यामधील सर्वांत गंभीर समस्या आहे. कानांसंदर्भात केल्या जाणाऱ्या तक्रारींना ध्वनीप्रदूषण प्रामुख्याने जबाबदार आहे.
कानाची ऐकण्याची क्षमता ध्वनिप्रदूषणामुळे कमी होत जाते असे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. ध्वनिप्रदूषणामुळे रक्‍तदाब वाढतो, श्‍वासाची गती वाढते, त्याबरोबरच काही लोकांना मायग्रेनचाही त्रास होऊ लागतो. मोठ्या आवाजामुळे अनेकांचे कानांचे पडदे फाटल्याचे प्रकारही घडले आहेत. वाहनांचे व अन्य आवाज येणाऱ्या ठिकाणी सतत राहिल्यामुळे त्या लोकांमध्ये चिडचिडेपणा आल्याचेही दिसून आले आहे. सध्याच्या तरुणपिढीत मोबाइलचा ईअरफोन आणि हेडफोन वापरण्याची लाटच आलेली आहे. तासन्‌तास कानाला ईअरफोन लावल्यामुळे कानाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो.
ईअरफोनवर सतत ऐकत राहिल्यामुळे कानाच्या पडद्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. बारीक आवाजातील बोलणे ऐकू येईनासे होते. 80 डेसिबल्सपेक्षा अधिक आवाजातील संगीत ईअरफोनद्वारे दररोज एक तासांकरिता ऐकल्यास त्या व्यक्‍तीला ऐकू न येण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते किंवा ही व्यक्‍ती कायमस्वरुपी बहिरी होण्याची शक्‍यता असते, असे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. स्फोट, बॉम्बस्फोट, अपघात अशा कारणांमुळे कानात अचानक खूप दुखू लागते. अशा प्रसंगात कानाच्या पडद्याला भोक पडते. अपघाताच्या वेळेला कान खूप दुखू लागला आणि नंतर ऐकू येईनासे झाले तर कानाच्या मधल्या भागाचे नुकसान झाले असल्याचे समजले जाते.
कान नेहमीच साफ आणि स्वच्छ ठेवणे. कान साफ करण्यासाठी टोक असलेल्या वस्तू वापरू नका. अशा वस्तू वापरल्यास कानातील नाजूक भागाला इजा होऊ शकते. 
कानाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये याकरीता गळ्याला आणि नाकाला झालेल्या संसर्गावर तातडीने उपाय करा. 
काही व्याधींमध्ये कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते असे दिसून आले आहे. तुम्हाला एखाद्या व्याधीत, आजारात कमी ऐकू येत असेल तर तातडीने डॉक्‍टरांशी संपर्क साधा. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)