तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का?

न्यायालयाने येरवडा जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे – एल्गार परिषद प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना कारागृहामध्ये वाचण्यासाठी पुस्तके देण्याचा आदेश असतानाही त्याचे पालन न करणाऱ्या येरवडा जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले आहे. तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या पाच जणांच्या जामीन अर्जावर 6 नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधीश के.डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅड. गडलिंग यांनी 25 जून रोजी न्यायालयाचा आदेश असतानाही पुस्तके दिली नसल्याची तक्रार केली होती. ती तक्रार गुरुवारी पुन्हा अॅड. निहालसिंग राठोड यांनी न्यायालयाकडे करताना न्यायालयाचे आदेश असताना देखील दहा पैकी गडलिंग यांना दोन पुस्तके देण्यात आल्याचे सांगितले. पुस्तके न देऊन कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला असल्याचेही म्हटले. याप्रकरणाच्या संबंधाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची एक प्रत गडलिंग यांना कारागृह प्रशासनाच्या पत्यावर पाठवूनही ती त्यांना पुस्तके पाठविण्यात आली नाहीत. त्यावर न्यायालयाने कारागृह अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच गडलींग यांनी डॉक्‍टरांनी लिहून दिलेली आयुर्वेदीक औषधेही पुरविण्यात कारागृह प्रशासन आडकाठी करत असल्याचे सांगितले. दरम्यान, ढवळे यांच्या वतीने कारागृहात त्यांना वस्तू पुरविण्यासाठी कोणीही नसल्याने त्यांच्या मित्राला त्यांना वस्तू पुरविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने त्यांनी मागणी केलेले कपडे न्यायालयात जमा करावी. ती बीलीफमार्फत ढवळे यांना पुरविण्यात येतील असे सांगितले.

दरम्यान, अॅड. सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन यापूर्वी न्यायालयात जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतरच जामिनावरील सुनावणी घेणे योग्य ठरेल असे न्यायालयाने नमूद केले. सुरेंद्र ढवळे, महेश राऊत, रोना विल्सन यांनी त्यांच्या वकीलामार्फत गुरुवारी जामिनासाठी अर्ज दाखल केला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार यांनी बाजू मांडली. तर बचाव पक्षातर्फे निहालसिंग राठोड, अॅड. सिद्धार्थ पाटील, अॅड. रोहन नहार,अॅड. शाहीद अख्तर,अॅड. राहुल देशमुख कामकाज पाहत आहेत.

महेश राऊत यांच्या पोटदुखीचा त्रास वाढला
महेश राऊतने त्याची तब्बेत ठीक नसून त्याला अल्सरचा त्रास असल्याने पोट दुखीच्या तीव्र वेदना होत असल्याचे सांगितले. त्याची पंधरा दिवसांनी तपासणी करण्यात यावी असे ससूनच्या डॉक्‍टरांनी सांगितले होते. वारंवार विनवणी करूनही सहा आठवडे झाले असताना देखील कारागृह प्रशासनाकडून ससून रुग्णालयात नेण्यात आले नसल्याची तक्रार राऊत याने केली.

कारागृह अधिकाऱ्यांना याबाबत न्यायालयाने विचारणा केल्यानंतर त्यांनी ससून रुग्णालयात नेण्यासाठी स्कॉट उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त करताना त्वरीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)