तुफान आलंया…

पद्माकर पाठकजी
गाव करी ते राव न करी अशी एक म्हण मराठी भाषेत आहे. तेथे राव या शब्दाचा अर्थ श्रीमंत माणूस असा आहे. एखाद्या धनवानाने पैसे ओतूनही जे काम होणार नाही तेच काम गावातील सर्व लोक एकत्र आल्यावर होऊ शकते. या म्हणी ज्या तयार झाल्या त्या निश्‍चितच काही अनुभवाने तयार झाल्या आहेत. फक्‍त आपल्या डोळ्यादेखत त्याचे प्रत्यंतर येत नाही म्हणून आपण काहीतरीच काय ?असे म्हणून हेटाळणी करण्यात अर्थ नाही.

अन्य म्हणींचे बाजूला राहू दे पण या वर उल्लेखीत म्हणीची सत्यता आपण सगळे आमीरखानच्या वॉटर कप स्पर्धेचा निमित्ताने अनुभवत आहोत. अर्थात ती स्पर्धा, ती योजना, ही संकल्पना एकट्या आमीर खानची नाही, तर त्याच्या मूळाशी साताऱ्यातील डॉ. अविनाश पोळ आहेत. आमीर खानच्या बरोबर सत्यजीत भटकळ आहेत. आमीर खानची पत्नी पण आहे. समाज हिताची एखादी नवीन योजना नवीन कल्पकता तशी काही जणांना सुचू शकते. पण ती प्रत्यक्ष आणणे म्हणजे एक दिव्य असते. काहीजण ते ही करतात पण वर्षभरानंतर त्यातील उत्साह ओसरतो. पण आमीरखान व त्याच्या सहकाऱ्यांचे वेगळेपण, मोठेपण हे की ते फक्‍त आरंभशूर राहिले नाहित. आणि एक वर्षात गळाठले नाहीत. तर गेली दोन वर्षे ही योजना राबवून या तिसऱ्या वर्षातही ती जास्त प्र तिसादाने ते यशस्वी करत आहेत.

महत्वाचे म्हणजे यात स्त्रियाही आहेत, मुले आहेत, पुरूषही आहेत, हिंदू आहेत, मुस्लीम आहेत, आणि बौध्दही आहेत. या वर्षी तर ब्लाईंड क्रिकेटीयरही सामील झाले. श्रमदान सर्वच करतात. एकेका चित्रपटासाठी लोखो रूपये मानधन घेणारा आमीर खान सातत्याने तीन वर्षे या कामासाठी वेळ देत आहे. उन्हातून हिंडतो आहे. मातीने भरलेली घमेली उचलतो आहे. त्याचे हे सारे कर्तुत्व पाहिले की जाणवते झगमगत्या शोच्या फिल्मी दुनियेतील हा अभिनेता खरोखरच वेगळा आहे. आजपर्यंत चित्रपटातून मिळवलेल्या पैशातून छानपणे ऐशो आरामाचे जीवन तो जगू शकतो. पण या देशा करीता समाजाकरीता आपण काही केले पाहिजे, ही त्याची सेवाभावी वृत्ती, ही त्याची कृतज्ञतेची भावना आणि त्याप्रमाणे तीन वर्षातील त्याचे काम, त्या कामात पूर्णपणे स्वत:ला गुंतवून घेऊन तो जे जीवन जगत आहे ते पाहिले की पटते की या जगात सगळेच स्वार्थाने लडबडलेले नाहीत. या जगात सगळच काही वाईट घडत नाही.

मूठभर स्वार्थी लोक असतील तर चिमुटभर का होईना निस्वार्थी लोक आहेत व जग त्यांच्यामुळेच चालले आहे. आमीर खानचे काम बघून जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, अक्षय कुमार, सुनिल बर्वे हे पण पुढे सरसावले. तरूण पिढीला आता आमच्यापुढे काही आदर्श नाही हे म्हणायची गजर नाही. आणि गावागावातील जे लोक एकत्र येऊन श्रमदान करत आहेत त्यांचे व यंत्रे पुरवणाऱ्या जैन फाऊंडेशनचेही काम हेच दाखवून देते की भारताला उज्वल भवितव्य आहे. या सर्वांचे नुसते अभिनंदन करून भागणार नाही तर त्यांच्या या कार्यात श्रम किंवा धन याद्वारे आपण सर्वांनीही सहभागी झाले पाहिजे, आणि सामाजिक बां धिलकेचे तुफान नेहमी वाहते ठेवले पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)