तुझी सेवा करीन मनोभावे

– डॉ. विनोद गोरवाडकर

ज्ञानेश्‍वरांचा एक अतिशय गोड अभंग आहे. त्याची सुरुवातच त्यांनी, “तुझी सेवा करीन मनोभावे’ या ओळीने केली आहे. सेवा करीन पण कशी तर “मनोभावे!’ “मनोभावे’ हा शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सेवा कशीही अपेक्षित नाही, तर ती मनःपूर्वक अपेक्षित आहे. मनातला भाव सेवेसाठी अर्पण केलेला असावा, तेव्हा ती सेवा सेवेकऱ्यांसाठी फलद्रुप होते आणि सेवा घेणाऱ्यासाठीही. सेवा प्रत्येकजण करतो आणि सेवा करण्याची वेळ प्रत्येकावर केव्हा ना केव्हा येते. ही वेळ संधी म्हणून स्वीकारणे म्हणजेच मनोभावे सेवा करणे होय. सेवेची पाळी माझ्यावर आहे, हे वाक्‍य “पाळी’ या शब्दांतून बळजबरीचा भाव व्यक्त करते. हा भाव त्या-त्या मनाचा असतो म्हणजे “मनोभावे’ सेवा करताना मनातला भावही त्या सेवेप्रती कृतार्थ असावा, कृतज्ञ असावा, ही देखील बाब लक्षात घेणे अनिवार्य ठरते.

घरामध्ये असणारी सेवा नात्यांचा अकृत्रिम मिलाप अधिकाधिक घट्ट करण्यासाठी उपयुक्त ठरते. कार्यालयांमध्ये असणारी सेवा भावबंध तर निर्माण करीत नाही, पण विश्‍वास मात्र निर्माण करू शकते. व्यवहारामध्ये असणारी सेवा तात्पुरती असते, पण ही तात्पुरती सेवा वेळोवेळी अनिवार्य ठरते. ही ठिकठिकाणी निर्माण होणारी परस्परसंबंधांमधली सेवा नुसती सेवा न राहता “मनोभावे’ झाली तर काय मजा येईल. पण “मनोभावे’ सेवा होणेच खूप कठीण आहे.

आईवडिलांची सेवा, गुरुजनांची सेवा, रुग्णाइताची सेवा, वृद्धांची सेवा, बालकांची सेवा, अपंगांची सेवा, परावलंबी असणाऱ्यांची सेवा, नातलगांची सेवा, गरजूंची सेवा, गुराढोरांची सेवा, भोवती वावरणाऱ्या प्रत्येकाची सेवा करण्याची वेळ प्रत्येकावर येऊ शकते आणि ही सेवा “आनंदाचा ठेवा’ म्हणून स्वीकारली की आपोप सेवेमध्ये कृतार्थभाव निर्माण होतो.
सेवा हा शब्द अहंकार दूर करण्यासाठी निर्माण झाला आहे. दुसऱ्यावर उपकार करण्याची भावना म्हणजे सेवा नाही. सेवेत परतफेडीची अपेक्षा नाही. “हे केलं म्हणजे हे मिळायला हवं’ असं वाटणं सेवेत अपेक्षित नाही. सेवा विनम्र असते. सेवा विनयशील असते. सेवा कमालीची धार्मिक असते. सेवा प्रामाणिक असते. सेवा विश्‍वासार्ह असते. कोणतीही सेवा असो, सेवेची ही गुणवैशिष्ट्ये आहेत. नुसती वैशिष्ट्ये नाहीत तर “गुण’वैशिष्ट्य! म्हणूनच सेवेचा वसा हाती घेणं अवघड गोष्ट आहे.
स्वतःच्या माणसांची सेवा करणं मनाने स्वीकारण्यासाठी तुलनेने अवघड नसतं पण सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक भावनेने सेवेचे क्षेत्र काम करण्यासाठी निवडणे आणि स्वीकारणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कुष्टरोग्यांची सेवा, मतिमंदांची सेवा, जळीत रुग्णांची सेवा, घृणा यावी असा आजार असणाऱ्यांची सेवा, वेड्यांची सेवा, सफाईची सेवा, झाडं लावण्याची सेवा, अन्नधान करण्याची सेवा कुठलाही स्वार्थ न ठेवता करीत राहणे अजिबात सोपे नाही.

काही लोक चर्चा न करता चांगल्या उपक्रमांना दान करतात. मोठमोठ्या दानशूर व्यक्तींच्या दानामुळे हजारो लोकांना आपोआप सेवा उपलब्ध होऊ शकते. हे “दान करणे’ म्हणजेही खूप मोठी सेवा ठरते. खेडोपाडी राहणाऱ्या गोरगरीबांपर्यंत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षणाची गंगा पोहचविणे, वैद्यकीय मदतीचा मार्ग प्रशस्त करणे या सेवेच्या विविध शाखा खरोखरीच समाजाला सुदृढ करणाऱ्या आहेत.

सेवा थोडी झाली तरी चालेल पण ती “सेवा’ या शब्दातील अर्थाला जागणारी असायला हवी. “सेवा परमो धर्मस्यः’ हे वचन सेवेला ुउच्चासनावर बसविते. सेवा हा प्रत्येकाचा परधर्म असायला हवा. तो असला की जीवन जगण्यासाठी प्रत्येक पावलावर लागणारे थैर्य, विश्‍वास, उमेद, उत्साह, परस्परांविषयी वाटणारी प्रगाढ आस्था आपोआप प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही. मुळात सेवा ही धैर्यावर आधारभूत असणारी बाब आहे. हे केल्यावर काही मिळणार आहे की नाही याची कुठलीही खात्री नसतानाही, किंबहुना मिळणार नाहीच, असे गृहित धरून करावयाचे काम हे धैर्यपूर्वकच करावे लागते. आज काही मिळत असेल तरच काही करायचे हा अलिखित नियम अतिशय घट्ट झालेला असताना या पार्श्‍वभूमीवर मनोभावे सेवेचा गंडा हातात घालणे आणि या गंडाबंधनाला निभावणे हे सतीचे वाणच म्हणावे लागेल.

माझे वागणे इतरांना सेवाच वाटावयास हवे. असे वागायचे जर मी ठरविले त्यातून सेवेचा एक अतिशय भक्कम मांडव उभा राहणे अवघड नाही. “ज्योतसे ज्योत जगाते चलो’तला मतितार्थ एकापासून दुसऱ्यापर्यंत आणि दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत या सेवेच्या श्रृंखलेतून निर्माण होईल. सेवाधर्म निभावणे अवघड असले तरी अशक्‍य मुळीच नाही. घरापासून “सेवे’चा प्रारंभ व्हावा आणि घरातली सेवा पक्व झाली की ती आपोआपच समाजापर्यंत घेऊन जाण्यास भाग पाडेल. घरामध्ये कसेही उद्दाम वर्तन करायचे आणि बाहेर “सेवाकर्मी’ म्हणून मिरवायचे, असे कधीच होऊ शकत नाही. आत आणि बाहेर सेवा वेगवेगळी असूच शकत नाही. सेवेचे नाटक केव्हा ना केव्हा उघडे पडते. कारण त्यावरचे बेगड नकली असते.

सेवा समजून घेणे आणि त्यानंतर ती स्वीकारणे केव्हाही हितावह ठरते. सेवा छोटी आणि मोठी अशी तफावत दाखविणारी कधीच नसते. सेवा ही सेवाच असते. त्यामुळे शक्‍य होईल ती सेवा करायची. मनाला सौख्यकारी वाटणारी प्रत्येक गोष्ट ही सेवाच आहे. याची खात्री बाळगायची आणि हळूवारपणे आपल्यातल्या सेवेच्या रोपट्याचा वृक्ष कसा होईल याचे चिंतन करायचे. तुमच्या प्रयत्नातून फोफावलेला हा सेवावृक्ष तुमची कीर्ती दिगंतात पोहचविल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)