तुकोबांच्या बीज सोहळ्यासाठी पूर्व नियोजनाची बैठक

देहुरोड – जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांचा 371 वा बीज सोहळा शुक्रवारी (दि. 22) संपन्न होणार आहे. या सोहळ्यातील भाविकांच्या सोयीसुविधांच्या आणि सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर विविध कामांचे पूर्व नियोजनासाठी विविध शासकीय अधिकाऱ्यांची देहू ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. 14) बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर परिसराची पाहणी करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार गीता गायकवाड, गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी अतुल गीते, देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण, संत तुकाराम महाराज संस्थानचे अभिजीत मोरे, विठ्ठल मोरे, नितीन मोरे, सरपंच, सदस्य, विविध शासकीय पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. महावितरणचे व राज्य परिवहन मंडळाचे पदाधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांना त्वरित सूचना नोटीस देऊन तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन टिळक यांनी माहिती देताना म्हणाले की, देहू गाथा मंदिर ते येलवाडी दरम्यानचा अर्धवट रस्ता शेतकरीच्या जमिनीचा शासनाकडून मोबदला न मिळाल्याने रखडला आहे. त्या ठिकाणी पायी रस्ता वगळता संपूर्ण रिंग रोड तयार आहे. पथदिव्याचे काम सुरू आहे. 126 युनिटचे दोन सुलभ शौचालय आहे. कागदोपत्र हस्तांतरीत वगळता यात्रेसाठी भक्‍त निवास संस्थानच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी इंद्रायणी नदीपात्रात असणारे जलपर्णी, शेवाळे यामुळे शुद्धीकरण फिल्टरमध्ये अडकून फिल्टरला अडचण निर्माण होते. त्यासाठी धरणातून नदी पात्रात पाणी लवकर सोडण्यात यावे, अशी मागणी करीत, क्‍लोरिन मुबलक असल्याचे तसेच 24 तास पाणी पुरवठा सर्व परिसरात पुरविण्याचे आश्‍वासन दिले.

शासकीय पदपथावरील तसेच रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात काढून घ्यावेत, असे आदेश देण्यात आले. पाण्याचे उदाहरण देत ते म्हणाले शेतातील पिके पाण्यावाचून जळत आहे, तर दुसरीकडे माणसाला पिण्यासाठी पाणी नाही, यामध्ये प्रथम महत्त्वाचे माणसाला पिण्यासाठी पाणी पाहिजे. तो जगला, तर शेती करता येईल, त्याचप्रमाणे यात्रेतील गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणे हटविल्यास यात्रेत घडणाऱ्या दुर्घटना दूर राहून भाविक सुरक्षित राहू शकतात. अतिक्रमणे काढून किंवा धंदे बंद पाडून मला आनंद होणार नाही. मात्र भाविकांची सुरक्षितता करणे गरजेचे आहे.
– सचिन बारवकर, प्रांताधिकारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)