तुकाराम माने : सेवेसाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्व !

तुकाराम माने आपल्या आजोबांबरोबर आळंदीत आले तेव्हा त्यांचं व्यक्‍तिमत्त्व सेवाभावाच्या पूर्णतः उलट होतं. स्वभावही आक्रमक होता; पण माऊलींचा सहवास मिळाला आणि त्यांच्यात बदल होऊ लागला. माऊलींनी मला चांगलं माणूस बनवलं आहे, तर मी त्यांच्याच सेवेत कायम राहिलं पाहिजे, या भावनेची अनेक माणसं आळंदीत आहेत. त्यातलंच एक लोकप्रिय नाव म्हणजे तुकाराम माने!

सेवा म्हणजे नेमकं काय? सेवेसाठी करावा लागणारा त्याग म्हणजे काय? याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आळंदीतल्या तुकाराम माने यांना भेटायला हवं. एकदा माऊलींच्या सेवेत आलं की आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्यातून माऊलीच आपल्याला मार्ग दाखवतील, या त्यांच्या प्रबळ विश्‍वासानंच त्यांच्या जीवनाची आजपर्यंतची वाटचाल झालेली आहे. या विश्‍वासामुळंच आयुष्यात कठीण वाटणारे निर्णय ते अगदी सहजपणे घेऊ शकले. आश्‍चर्य म्हणजे हे निर्णय घेतल्यानंतर आयुष्याचा आलेख उतरता नाही तर तो चढताच राहिला. “हीच तर माऊलींची कृपा आहे… माऊली आपल्याला कधी चुकीच्या दिशेनं नेणारच नाहीत’, हे शब्द त्यांच्या बोलण्यात वारंवार येतात. त्यांचा जीवन प्रवास ऐकल्यावर त्यांच्या तोंडून निघालेल्या या शब्दांची प्रचिती आपल्यालाही येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बदलाची सुरुवात
तुकाराम माने हे मूळचे सातारचे. त्यांचे आजोबा मुंबईत पोर्टरमध्ये नोकरीला होते. वडील मुंबईत टेलरिंग करायचे. पण तुकाराम माने यांना जास्त सहवास मिळाला तो आजोबांचा! ते आजोबांबरोबर आळंदीत आले. माऊलींच्या सहवासात आले, तेव्हापासून ते आजतागायत माऊलींचे सच्चे सेवक बनले. खरंतर भविष्यात तुकाराम माने इतक्‍या सच्चेपणानं सेवा करतील याची खात्री लहानपणी कुणीही देऊ शकलं नसतं. कारण त्यांचा स्वभाव प्रचंड टारगट. मारामारी आणि भांडणं करणं, हा तर स्थायीभाव. सुरा-चाकू कायम खिशात असायचा. त्यांचे केसही अगदी कमरेपर्यंत वाढलेले होते. आजोबा माळकरी होते. मटण-मांस खाणाऱ्यांच्या घरात जातो म्हणून आजोबांनीही त्यांना कधी जवळ केलं नाही. आजोबांची माळ जीर्ण झाली म्हणून त्यांनी काढून त्यांनी नवी घातली. आजोबांनी काढून ठेवलेली जीर्ण तुळशीची माळ तुकाराम यांनी गळ्यात घातली आणि तुकाराम यांच्या अंतर्बाह्य बदलाची सुरुवात झाली. त्याबद्दल ते सांगतात, “” आळंदीत मी “स्वकाम’ संस्थेच्या सारंग जोशी यांच्या संपर्कात आलो. स्वकामच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सेवेचा संस्कार झाला. सेवा करताना कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, फक्त त्यातला आनंद घ्यायचा हे मी इथंच शिकलो. अगदी झाडू मारण्यापासून ते शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं विनासंकोच मी करत गेलो. ही कामं करतानाच माझं मनही स्वच्छ होत गेलं. “स्वकाम’द्वारे सेवा करत असतनाच आळंदी देवस्थानात नोकरीची संधी चालून आली. माऊलींच्या पायाशी मला कायम राहता येईल यामुळं मी ही नोकरी स्वीकारली. तेव्हा 1200 रुपये मला पगार होता. खरंतर या पगारात भागायचं नाही, पण कधी काही कमीही पडलं नाही. ही नोकरी मी कशी स्वीकारली त्याचंही आज आश्‍चर्य वाटतं. कारण याआधीच्या नोकरीत मला 6500 रुपये पगार होता. अंधेरीला बॉक्‍स पॅकिंगचं काम मी करायचो. 6500 पगारावरून 1200 रुपयांच्या नोकरीवर कोण रुजू होईल? पण वाटतं, की हे माऊलींच्याच मनात असेल. संस्थानात नोकरी लागल्यावर काही दिवसांनी बिर्ला ग्रुपचे वसंतकुमार आणि सरलाबेन बिर्ला यांच्या संकल्पानुसार माऊलींच्या मंदिरात अजाण वृक्षाच्या छायेखाली पवित्र ज्ञानेश्‍वरीचं पारायण केलं.

या पारायणात मी रंगून गेलो. त्यांनी 1000 रुपये मानधन देऊ केलं; पण माऊलींच्या ज्ञानेश्‍वरीचं अमृत मिळाल्याचं समाधानच इतकं होतं, की हे मानधन घेण्यास मी नकार दिला. बिर्ला यांना माझी हीच गोष्ट आवडली असावी. त्यांनी मला 7500 रुपये पगाराची नोकरी देऊ केली. हा पगार घेतला असता तर तेव्हा समोर असलेले जगण्याचे सगळे प्रश्‍न सुटले असते. तेव्हा माझं लग्नही झालं होतं. पण माऊलींच्या सेवेत राहायचं म्हणून मी या नोकरीला नकार दिला. माझ्यातला हाच सेवाभाव त्यांना आवडला होता त्यामुळं काही दिवसांनी त्यांच्या पंढरपूरच्या गेस्ट हाऊसची व्यवस्था पाहण्यासाठी 12 हजार रुपयांच्या नोकरीची ऑफर त्यांनी मला दिली.

मी त्यासाठी तयारही झालो. कारण मुलांचं शिक्षण आणि संसाराचा गाडा या पैशांमुळं व्यवस्थित चालणार होता. पंढरपूरला निघालोही. माऊलींच्या सेवेत आपल्याला काहीही कमी पडणार नाही, असं म्हणत बायकोनं विरोध केला. मलाही ते पटलं आणि खरंच माऊलींच्या कृपेनं काहीच कमी पडलं नाही.”

तुकाराम माने पुढं जमीन खरेदी विक्रीचे कामं करू लागले. खरंतर त्यांचं कुठं ऑफिस नाही, साधं कार्डही नाही. पण या क्षेत्रात त्यांचं नाव खात्रीशीरपणे आणि आदरानं घेतलं जातं. जमिनीचा काही प्रश्‍न उद्‌भवला की लोक त्यांना स्वतःहून फोन करतात. पण त्याची सुरुवात कशी झाली असं विचारलं असता ते म्हणाले,””माऊलींच्या सेवेत असतानाच 2000 साली एका जमिनीचा प्रश्‍न माझ्याकडे आला. तो प्रश्‍न मी सोडवला. मला स्वतःला त्यातून काही नको होतं. त्यामुळं मी खूप कमी किमतीत जमीन विकली. त्यामुळं ज्यांची कधी घरं होऊ शकली नसती, त्यांची घरं झाली. या सगळ्यांनी मिळून माझं नाव सोसायटीला द्यायचं ठरवलं. “तुकाराम नगर’ हे नाव त्यांनी ठरवलं. त्यांची भावना चांगली होती, पण मला माझं नाव द्यायला आवडलं नसतं. कारण त्यांची घरं व्हावी, अशी माझीच इच्छा होती. मग मी त्यांना “संत तुकाराम नगर’ असं नाव द्या असं सुचवलं. त्यांनाही ते पटलं. आजही चाकण रोडला हे नगर आहे.” त्याचप्रमाणे आळंदीत घुंडरे पाटील नगरमध्ये नंदकुमार आंबवणे यांच्या जागेची समस्या माने यांनी कुशलपणे सोडवून त्या जागेवर आंबवणे कुटुंबीयांच्या माध्यमातून इमारतीचे बांधकाम करून घेतले. याच ठिकाणी माने कुटुंबीय गेली 10 वर्षांपासून वास्तव्यास आहे.

तुकाराम माने यांनी केलेलं संत तुकारामनगरचं केलेलं हे पहिलं प्लॉटिंग. जमिनीशी संबंधित कोणतंही काम करताना तुकाराम माने कोणतंही कमिशन घेत नाहीत. मग त्यांना पैसे मिळतात कसे? तर वादात असलेल्या जमिनीवर असलेला बोजा कमी करून ती जमीन तुकाराम माने खरेदी करतात आणि नंतर त्याची विक्री करतात, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. व्यवसाय म्हणून या कामाकडे तुकाराम माने यांनी कधीही पाहिलं नाही. जमीन व्यवहारात अनेक लोक अडकलेले असतात, त्यांना मदत करताना त्यांच्याकडून पैसे कशाला घ्यायचे, मला माऊली देतात ते खूप आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या भावनेनं काम केल्यामुळं त्यांच्याकडे काही प्रॉपर्टीही जमा झाली. ही प्रॉपर्टीचा वापरही माऊलींच्याच सेवेसाठी करायचं त्यांनी ठरवलं आहे. त्यांच्या आळंदीच्या एका जमिनीवर मोठं भक्तनिवास बांधायचं आणि भाविकांसाठी अन्नछत्र बांधण्याचं नियोजन त्यांनी केलं आहे. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मी माऊलींच्याच कृपेनं आलो, अशी भावना तुकाराम माने व्यक्त करतात. इतकंच नाही तर स्वतःची सर्व प्रॉपर्टी आळंदी संस्थानला अर्पण करण्याची त्यांची इच्छा आहे. या मागची भूमिका सांगताना ते म्हणतात, “”माझ्याकडे काहीही नव्हतं. माऊलींच्याच कृपेमुळं मी इथपर्यंत आलो. वडिलांनी हे सगळं निर्माण केलंय ते आपल्यासाठीच आहे, असा भाव त्यांच्या मनात यायला नको. उलट मी जसं स्वतःच्या हिमतीवर पुढं आलो, तसंच त्यांनीही यावं, असं माझं मत आहे. त्यामुळंच जे काही मिळवलं ते माऊलींचं आहे, ते माऊलींनाच अर्पण करावं असं वाटतं.”

सुपरवाझर नव्हे, सेवक !
ही सगळी सेवा करताना आजही तुकाराम माने आळंदी देवस्थानात सुपरवायझर म्हणून नोकरी करत आहेत. त्यांचा दिवसच माऊलींच्या दर्शनानं सुरू होतो. त्यानंतर विश्रांतवड, माऊलींची बाग, चालवलेली भिंत, पद्मावती मंदिर या ठिकाणी ते राउंड घेतात. सर्व व्यवस्थेची पाहणी व इतर संस्थानची काही कामं करतात. हे काम त्यांना नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून करण्याची इच्छा आहे. मानधन नको असा अर्जही त्यांनी संस्थानला दिला होता; पण नियमानुसार कर्मचाऱ्याला मानधन घेणं बंधनकारक आहे. मग तुकाराम माने वर्षभराचं सगळं मानधन ते दान करतात. अलीकडेच एक लाख रुपयांची देणगी त्यांनी संस्थानला दिली आहे. कर्मचारी आपलं मानधन देणगी स्वरूपात पुन्हा परत करतो, ही संस्थानच्या इतिहासातली आगळी वेगळी घटना आहे. याच सेवाभावासाठी तुकाराम माने आळंदीत लोकप्रिय आहेत.
“सेवेसि ठायी तत्पर’ हे हिरोजी इंदलकरांनी शिवाजी महाराजांसाठी रायगडाच्या पायरीवर कोरलेलं वाक्‍य आहे. त्याचप्रमाणं माऊलींच्या सेवेत तुकाराम माने अखंडपणे आहेत. त्यांच्या सहवासात आल्यानंतरच त्यांचं आयुष्य पूर्णतः बदलेलं, अशी त्यांची धारणा आहे. इतकंच नाही तर अनेक चांगली कामं माऊलींनी माझ्याकडून करून घ्यावी, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. “माणसांचं आयुष्य इच्छा-अपेक्षांचं आहे. एक अपेक्षा पूर्ण झाली की दुसरी.. दुसरी पूर्ण झाली की तिसरी.. हे चक्र सुरूच राहणार आहे. जगण्याच्या या चक्रातून लवकरच मुक्‍त होऊन मला संन्यास घ्यायचा आहे. कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करून मला सेवाभाव पत्करायचा आहे. त्यादिशेनंच माझी वाटचाल सुरू आहे.’ अशा भावना व्यक्‍त करून माऊलींच्या सेवेत ते आतूर असल्याचं अधोरेखित करतात.

राजकारणात जाऊ नये अशी “त्यांचीच’ इच्छा!
अलीकडेच तुकाराम माने यांनी राजकारणातही नशीब आजमावून पाहिलं. निवडणुकीत निवडून येईल अशी खात्री असल्यानं ते निवडणुकीत उभे राहिले. मात्र ऐनवेळी “राजकारण’ केलं गेलं. त्यामुळं आपण निवडून येणार नाही हे त्यांना निकालाआधीच कळून चुकलं. निकालाच्या दिवशी त्यांचे पाठीराखे “तुकाराम माने तुम्ही निवडून येणार..’ असं म्हणत होते. पण माने मात्र सकाळीच माऊलींच्या सेवेत हजर झाले होते. “राजकारणात गेलो असतो, तर आयुष्याला कदाचीत चुकीची दिशा मिळाली असती, त्यामुळं माऊलींनीच त्या वाटेला मला जाऊ दिलं नाही’, अशी भावना तुकाराम माने व्यक्‍त करतात.

माने कुटुंबात आदराचं स्थान
सेवाभावामुळं तुकाराम माने यांच्याकडे कुटुंबातही आदरानं पाहिलं जातं. घरातला कोणताही निर्णय त्यांना विचारल्याशिवाय घेतला जात नाही. त्यांचे आई-वडील गावाकडे असतात. त्यांची आजी वयाच्या शंभरीजवळ आहे. तरीही ती शेतात काम करू शकते इतकी ठणठणीत आहे. हे सगळं माऊलींच्या कृपाशीर्वादानं घडत आहे, असं माने म्हणतात. माने यांच्या पत्नीचीही मोलाची साथ त्यांना आहे. आपला पती चुकीचं काम करणार नाही, याचा तिला विश्‍वास असतो. ओम आणि पांडुरंग ही मुलंही मानेंच्या संस्कारात घडत आहेत.

माऊलींच्या सेवेत मानेंचा अश्‍व!
माऊलींच्या पालखीच्या अश्‍वाचे शितोळे सरकार मुख्य मालक. 2018 च्या वारीत माऊलींच्या पालखीच्या अश्‍वाचे निधन झाले. तत्काळ दुसरा अश्‍व उपलब्ध होणं अवघड होतं. राजाभाऊ चोपदार यांनी तुकाराम माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला अश्‍व लगेचच उपलब्ध करून दिला. माऊलींच्या सेवेत आपला अश्‍व असल्याची भावनाच माझ्यासाठी खूप मोठी असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर भविष्यात माऊलींसाठी अश्‍वाची गरज लागली तर आपलाच अश्‍व त्यांच्या सेवेत असावा या भावनेनं माने दोन अश्‍व माद्यांचा सांभाळ करत आहेत.

संकलन: एम. डी. पाखरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)