तीळ “रूसली’; गुळ, शेंगदाणे मात्र स्वस्त

मकरसंक्रातीच्या पार्श्‍वभूमीवर उलाढाल वाढली
 
पुणे – मकर संक्रातीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात तिळाला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाच्या किंमतीत किलोमागे 15 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर, गुळ आणि शेंगदाण्याचे भाव उतरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

“गेल्या वर्षी साधे तीळ 125 ते 140 रुपये किलो होते. यावर्षी त्याची किंमत 135 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. स्वच्छ धुतलेल्या तिळाला 155 ते 170 रुपये भाव मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यासह गुजरात, राजस्थन, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथून तीळ शहरातील बाजारात येत आहे,’ असे व्यापारी तेजस पटेल यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेत चिक्की गुळाला कमी भाव मिळत आहे. गेल्या वर्षी चिक्की गुळाला घाऊक बाजारात किलोला 50 रुपये किलो भाव मिळत होता. त्यामध्ये घट होऊन यावर्षी किलोस 36 ते 45 रुपये भाव मिळत आहे. याविषयी व्यापारी जवाहरलाल बोथरा म्हणाले, “राज्यात दुष्काळ पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर लवकर रोख पैसे मिळावेत, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळांकडे माल पाठविण्यास पसंत देत आहेत. त्यामुळे गुळाचे उत्पादन जास्त झाले आहे. परिणामी, गुळाला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे.’

“गुळपापडी, गुळाची पोळी, लाडू, गोडीशेव, चिक्की बनविण्यासाठी संक्रातीच्या सणाच्या वेळी चिक्की गुळाला दरवर्षी जास्त मागणी असते. त्या प्रमाणे यावर्षीही आहे. तर, दुसरीकडे शेंगदाणा बाजारात मंदी आहे. दरवर्षी संक्रांतीच्या वेळी शेंगदाण्याला जास्त भाव मिळतो. मात्र, यावर्षी ऐन सणाच्या वेळी मागणी घटल्याने मागील दहा दिवसांत शेंगदाणाच्या भावात घाऊक बाजारात क्विंटलमागे 200 ते 350 रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात घुंगरू शेगदाण्याला किलोस 72 ते 75 रुपये आणि स्पॅनिश शेंगदाण्याला 78 ते 82 रुपये भाव मिळत आहे,’ असे शेंगदाण्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)