तीन हजारांची लाच घेताना एकाला पकडले

पुणे – सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना एका खासगी व्यक्‍तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही घटना हवेली तालुक्‍यातील सजा कात्रज येथे घडली. विजय भीमराव भोळे (34, रा. इंदापूर), असे आरोपीचे नाव आहे. तो येथील कार्यालयात खासगी कामे करतो.

तक्रारदार येथे सातबारा उताऱ्यावर फेरफार करण्यासाठी तलाठी कार्यालयात आले होते. तेव्हा आरोपीने त्यांना सातबारा उताऱ्यावर तलाठ्याकडून फेरफार करुन नोंद केलेली प्रत देतो, असे सांगून तीन हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या तकारीची शहानिशा करुन शनिवारी सापळा रचण्यात आला. ही रक्‍कम अलंकार थिएटरजवळ स्वीकारताना आरोपीला अटक करण्यात आली. अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)