तीन महाविद्यालयांकडे एका गावाचे पालकत्व

विद्यापीठाचे निर्दश : राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत “समर्थ भारत अभियान’

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील 150 गावे दत्तक घेण्यात येणार आहेत. नव्या निर्णयानुसार राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आता तीन महाविद्यालयांना एकत्र येऊन एक गाव दत्तक घ्यावे लागणार आहे. महाविद्यालयांनी राहण्या-खाण्याची उत्तम सोय व्हावी हाच गावाच्या निवडीचा निकष न ठेवता सर्वांगिण विकास व संरचनात्मक कामाचे उद्दीष्ट ठेवावे लागणार आहे.

-Ads-

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त विद्यापीठाने दत्तक गाव योजनेत चालू वर्षी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एका महाविद्यालयाने एक गाव दत्तक घेण्याऐवजी तीन महाविद्यालयांनी एकत्र येऊन एका गावाची निवड करावी व याच गावात सात दिवसांचे विशेष शिबीर घ्यावे, असे निर्देश राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी यांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.

महाविद्यालयांनी आपआपसातील सामंज्यस्यानुसार एकत्र येऊन येत्या डिसेंबर, जानेवारी महिन्यात विशेष शिबिराचे संयोजन करावे. दत्तक गावाची निवड केल्याची तपशीलवार माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागास 20 नोव्हेंबरपर्यंत ई-मेलद्वारे पाठवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. “समर्थ भारत अभियान’ या अर्थशीर्षाअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळही विशेष शिबिरात सहभागी होणार आहे. विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी, स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी दोन दिवसांसाठी शिबिरात सहभागी होणार आहेत. याचा खर्च विद्यार्थी विकास मंडळांतर्गत करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय बैठक
महाविद्यालयांनी गावची निवड केल्यानंतर सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत शिबिराची कार्यक्रम पत्रिका, कामाचा तपशील, उपक्रमांचे तपशील, योजनांचा आराखडा, सर्वेक्षणाचे स्वरुप याबाबतचे निर्देश देण्यात येणार आहेत. सविस्तर माहितीची एक संक्षिप्त मार्गदर्शिकाही महाविद्यालयांना देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

आखीव-रेखीव नियोजन करावे लागणार
महाविद्यालयांनी दत्तक गावाची निवड करताना केवळ राहण्या-खाण्याची उत्तम सोय हाच निकष ठेवू नका. पुढील तीन ते पाच वर्षांत गावचा सर्वांगिण विकास व संरचनात्मक काम करण्याचा हेतू ठेवावा. यावर्षी समर्थ भारत अभियानाची सकारात्मक परिणती देशपातळीवर पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांनी शिबिरांचे अधिक आखीव-रेखीव नियोजन करावे. अत्यंत नेटके, सर्वव्यापी व अधिक परिणामकारक शिबिराच्या आयोजनांसाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत, असे निर्देशही महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)