तीन मंत्र्यांच्या घोषणेनंतर ही उद्घाटन होईना

सरकारसह प्रशासनाची उदासिनता : नागरिकांची पायपीट सुरूच

सम्राट गायकवाड

सातारा – मागासवर्गीय समाजातील नागरिकांना आवश्‍यक सर्व कागदपत्रे एकाच छत्राखाली उपलब्ध व्हावीत, या उदात्त हेतूने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन उभारण्यात आले आहेत. त्या प्रमाणेच साताऱ्यात देखील सामाजिक न्याय भवन हे कसे बसे उभारण्यात आले. मात्र, अद्याप ते उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. उद्‌घाटन व कामाच्या दर्जाबाबतचे विषय आत्तापर्यंत सातारा दौऱ्यावर आलेले ना. रामदास आठवले, ना. राजकुमार बडोले व ना. दिलीप कांबळे यांच्यापर्यंत पोहचविण्यात आले. मात्र, त्यावर तिन्ही मंत्र्यांनी उद्‌घाटन व दर्जाच्या तपासणीबाबत घोषणा करून ही कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.

-Ads-

साधारण साडे पाच वर्षापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालिन सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते पुणे-बेंगलोर महामार्गानजीक बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात सामाजिक न्याय भवनाचे भूमिपुजन करण्यात आले. ज्या ठिकाणी भूमिपुजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी गोरगरिब मजूरांच्या झोपड्या होत्या. प्रशासनाने पुर्नवसनाचा शब्द देत त्या परिसरात एका बाजूला वसविण्यात आल्या. परिणामी अतिक्रमणाचा प्रश्‍न निकालात निघाल्यानंतर न्याय भवनाच्या तीन स्वतंत्र इमारती त्या ठिकाणी उभारण्यात आल्या. मात्र, भूमिपुजन होवून तब्बल पाच वर्ष होवून देखील न्याय भवनाचे उद्‌घाटन करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी मनापासून प्रयत्न करताना दिसून आले नाही. मागील अडीच वर्षात सुरूवातीला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले सातारा दौऱ्यावर आले तेव्हा पत्रकारांनी तसेच रिपाइं ब्ल्यू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी न्याय भवनाची स्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर ना. बडोले यांनी ताफ्यासहित न्याय भवनात दाखल झाले. खुद्द बडोले यांनी बांधकाम व बसविण्यात आलेले दरवाजांची पाहणी केल्यानंतर सर्व कामांचे ऑडीट करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. मात्र, अद्याप तशा प्रकारचे ऑडीट कायदेशीर कारणे समारे करून करण्यात आले नाही.

अशा स्थितीत कसे बसे न्याय भवनाच्या तीन इमारती उभा राहिल्या. मात्र, उद्घाटन होत नसल्याने सातारा दौऱ्यावर आलेले केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यापर्यंत उद्‌घाटनाचा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच उद्‌घाटन करण्याचे आश्‍वासन दिले मात्र, अद्याप उद्‌घाटनाच्या दृष्टीने ना सामाजिक न्याय विभाग ना बांधकाम विभाग प्रयत्न करताना दिसून येत नाही. वास्तविक न्याय भवनाचे उद्‌घाटन होवून ते खुले झाले तर त्या ठिकाणी समाज कल्याण सह.आयुक्त कार्यालय, जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालय आणि बहुतांश महामंडळाची कार्यालये एका छत्राखाली येणार आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाजाला आवश्‍यक कागदपत्रे एकाच छताखाली उपलब्ध होणार असून पायपीट देखील थांबणार आहे.


बोंबा बोंब आंदोलन करणार : ओव्हाळ

सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन व्हावे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करित आहोत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. परंतु येत्या दिवसांमध्ये उद्‌घाटन होवून मागासवर्गीय नागरिकांची पायपीट थांबली पाहिजे यासाठी रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करणार असल्याचे बाबा ओव्हाळ यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)