तिहारमधील पुरुषांच्या तुरुंगासाठी प्रथमच महिला अधीक्षक!

नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठा आणि मोठी सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या तिहार तुरुंगातील पुरुषांच्या तुरुंग अधीक्षपदी आयपीएस अंजू मंगला या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तिहारच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी तिहार तुरुंगाचे महासंचालक म्हणून किरण बेदी आणि विमला मेहरा यांनी काम पाहिले आहे. हे अगदी उच्च पातळीवरचे काम असल्याने त्यांचा थेट तुरुंगातील कैद्यांशी संबंध येत नव्हता. मात्र, नव्याने नियुक्त झालेल्या अंजू मंगला यांची पुरुषांच्या तुरुंगाच्या अधीक्षक म्हणून नेमणूक झाल्याने त्यांचा दररोज पुरुष कैद्यांशी संपर्क राहणार आहे.
या तुरुंगात 18 ते 21 वयोगटातील 800 कैदी आहेत. “जेलर’ हा शब्द कठोर वाटत असल्याने आपल्याला “जेलर’ असे न संबोधता अधीक्षक म्हणून संबोधण्यात यावे असे मंगला यांनी म्हटले आहे. यापूर्वी महिलांच्या तुरुंग अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या अंजू मंगला सांगतात की, पुरुष कैदी असोत किंवा महिला कैदी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या चांगला संवाद साधणे ही आपली कामाची पद्धत आहे. हे कैदी माझी मुले असल्यासारखे मी समजते. तुरुंगात कैदी म्हणून आलेल्या या तरुणांमध्ये मोठी उर्जा आहे. मात्र, ते कायद्याच्या विरुद्ध दिशेला अर्थाच चुकीच्या मार्गावर असल्याने त्यांची येथे रवानगी झाली आहे. तुरुंगांत कैद्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात त्यांना तशा पद्धतीचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते त्यामुळे या जागेला “गुरुकूल’ किंवा “वसतिगृह’ असे संबोधणे आपल्याला आवडेल असे त्यांनी म्हटले आहे.
पुरुषांच्या तुरुंगाची जाबाबदारी हे आपल्यासाठी एक आव्हान असून महासंचालक सुधीर यादव यांनी आपल्यावर हा विश्‍वास टाकल्याने आपणही ही जबाबदारी स्विकारल्याचे मंगला यांनी म्हटले आहे. कैद्यांमध्ये वेगळेपण निर्माण व्हावे यासाठी तुम्ही त्यांना कशी वागणूक देतात हे महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुरुंगात असताना तरुण कैद्यांना औपचारिक शिक्षण मिळत नाही. त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडता येईल असे शिक्षण देणे आवश्‍यक असून त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होईल असेही मंगला यांनी म्हटले आहे. तिहार तुरुंगात असताना शिक्षण सुटलेल्या कैद्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे मंगला यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)