तिसऱ्या दिवशी भारताचा कडवा प्रतिकार ; इंग्लंडकडे 40 धावांची आघाडी

 रविंद्र जडेजा नाबाद 86 धावांनी भारताची लाज राखली 
लंडन:  आज 6 बाद 174 या धावसंख्येवरुन पुढे डावाला सुरुवात केलेल्या भारताने आज सर्वबाद 292 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडकडे 40 धावांची आघाडी असून भारताच्या रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारीयांनी केलेल्या कडव्या प्रतिकारामुळे भारताला इंग्लंडच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचण्यास मदत मिळाली. दरम्यान हनुमा विहारीने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावताना 56 धावांची बहुमोल खेळी केली तर मालिकेत पहिल्या चार सामन्यात संधी न मिळालेल्या रविंद्र जडेजाने नाबाद 86 धावांची खेळी केली.
भारताच्या हनुमा विहारीने कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावण्याच पराक्रम केला. त्याने 124 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार खेचून 56 धावांची खेळी साकारली. पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो भारताचा 26वा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून 82 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. 6 बाद 174 धावसंख्येवरून तिसरा दिवसाच्या खेळाची सुरुवात करताना विहारी आणि जडेजा यांनी भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. दोघांनी संयमी खेळ करताना संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. विहारीने अर्धशतकी खेळी करून संघातील निवड सार्थ ठरवली. 56 धावांवर असताना मोईन अलीने त्याला बाद केले. 1974 मध्ये पार्थसार्थी शर्मा यांनी पदार्पणात केलेल्या 54 धावांना मागे टाकण्याच पराक्रम विहारीने केला. इंग्लंडमधील भारतीयाने पदार्पणात केलेली ही चौथी सर्वोत्तम खेळी ठरली. विहारी बाद होताच सातव्या विकेटसाठीची जडेजासोबतची 77 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. यानंतर इशांत शर्मा (4) आणि मोहम्मद शमी (1) झटपट बाद झाले. दरम्यान अखेरच्या गड्यासाठी रविंद्र जडेजा अणि जसप्रीत बुमराहयांनी 32 धावांची भागीदारी करत संघाला 292 धावांचा टप्पा गाठुन दिला.
तत्पूर्वी, कालच्या दिवशी सामन्याच्या सुरुवातीलाच शिखर धवन केवळ 6 धावांवर बाद झाल्यावर राहुल व पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 21 षटकांत 64 धावांची भागीदारी करीत भारताचा डाव सावरला. करनने राहुलला बाद करीत ही जोडी फोडली. राहुलने 53 चेंडूंत 4 चौकारांसह 37 धावा केल्या. भारतीय संघाला आकार देण्याच्या दृष्टीने खेळपट्टीवर स्थिरावलेला चेतेश्‍वर पुजारा 37 धावांवर बाद झाला. अँडरसनने त्याला उत्कृष्ट चेंडू वर बाद केले. बाद होण्याआधी बरेच चेंडू बॅटला लावण्याचा पुजारा प्रयत्न करत होता, पण त्याला चेंडू समजला नसल्याचे दिसत होते.चेतेश्‍वर पुजारा बाद झाल्यानंतर अजिंक्‍य रहाणे कडून भारताला अपेक्षा होत्या. मात्र त्याला कर्णधार विराट कोहलीला साथ देता नाही.
7 चेंडूत 0 धावा करून तो माघारी परतला. अँडरसनने डावातील दुसरा बळी घेण्यात यश मिळवले. पदापर्णचा सामना खेळणाऱ्या हनुमा विहरीला शून्यावर असताना पंचांनी बाद ठरवले होते. पण डीआरएसने त्याला नामुष्कीपासून वाचवले. डीआरएसच्या रिव्ह्यूमध्ये त्याला नाबाद ठरवण्यात आले. स्थिरावलेला पुजारा आणि लगेच बाद झालेला उपकर्णधार रहाणे यांच्या धक्क्‌यानंतर विराटने भारताला सावरले. त्याच्या झुंजार खेळीमुळे भारताने 150 टप्पा गाठला, मात्र विराटला अर्धशतकाने हुलकावणी दिली. विराट 49 धावांवर बाद झाला. बेन स्टोक्‍सने त्याला तंबूत धाडले. तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत देखील केवळ पाच धावांवर परतला. यावेळी इंग्लंड कडून अँडरसन आणि स्टोक्‍सयांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
जेम्स अँडरसनच्या मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश
भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला दंड सुनावण्यात आला. अँडरसन कलम 2.1.5 च्या अंतर्गत दोषी आढळला. त्याने पंचांच्या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली होती.
सप्टेंबर 2016 नंतर अँडरसनकडून प्रथमनच आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. 29 व्या षटकात अँडरसनने पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली होती. अँडरसनच्या गोलंदाजीवर विराट कोहली पायचीत असल्याची अपील इंग्लंडच्या खेळाडूंनी केली. परंतु धर्मसेनाने ती नाकारली आणि अँडरसनने त्यांच्याबरोबर उर्मट भाषेत वाद घातला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)