तिसरी आघाडी (अग्रलेख)

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या महिन्याच्या पूर्वार्धात डिनर डिप्लोमसीचा एक भाग म्हणून सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात मोट बांधण्यासाठी हे एक पाऊल होते. त्यानंतर काही दिवसांतच देशात “तिसरी आघाडी’ उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, हे विशेष मानावे लागेल. सत्ताधारी भाजप आघाडी ही पहिली आघाडी आणि प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसची दुसरी आघाडी यांच्या व्यतिरिक्त देशाला तिसऱ्या पर्यायाची गरज आहे, हा विचार यापूर्वीही समोर आला होता; आणि प्रत्यक्षातही आला होता.

प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षेच्या काळात तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षाची उद्दिष्टेही संकुचित असल्याने, राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून या आघाडीकडे पाहता येईल का, याबाबत शंका आहेच. स्वतःचे स्वत:च्या राज्यातील स्थान मजबूत करण्याच्या नादात केंद्रात भाजपचे स्थान अधिक मजबूत होण्याचा धोका, या संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवा.

पण आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असतानाच, “तिसरी आघाडी’ही कार्यरत होऊ लागली आहे, हे महत्त्वाचे आहे भाजप आणि कॉंग्रेस हे एकाच माळेचे मणी आहेत अशी भावना बहुतेक पक्षांच्या मनात असल्यानेच हा तिसरा पर्याय उभा राहू लागला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. मंगळवारी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीपूर्वी बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील भेट घेतली होती. दिल्लीतील या घडामोडी निश्‍चितच सूचक आहेत.

सोनिया गांधी यांच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते आणि त्यांनी त्यानंतर तिसऱ्या आघाडीबाबतही ममता यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे, भाजपबरोबर सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने ममता यांच्याशी चर्चा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सत्ताधारी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच गेल्या आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही बिगर-भाजप आणि बिगर-कॉंग्रेस अशी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशानेच बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी “तिसरी आघाडी’ स्थापन करण्याचे सूतोवाच करतानाच नेतृत्व सामूहिक असेल, असे स्पष्ट केले आहे. चंद्राबाबू नायडू यांनीही तिसऱ्या आघाडीत सहभागी व्हावे, असे ममता यांचे प्रयत्न आहेत.

सोनिया गांधी यांनी मोदी यांच्या विरोधात मोर्चा उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरु केले असतानाच प्रादेशिक पातळीवरील प्रभावी पक्षांनी “तिसरा पर्याय’ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, याला वेगळा अर्थ आहे. पूर्वी भाजपशी मैत्री असलेल्या या पक्षांना आता मोदी यांची मैत्री नको आहे. दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहे असे या पक्षांना स्पष्टपणे वाटत आहे. राहुल यांचे नेतृत्व सर्व विरोधकांनी अद्याप मान्य केलेले नाही. मोदी यांना आव्हान देऊ शकेल, असे एकही नेतृत्व कॉंग्रेससह कोणाकडेच नसल्याने साऱ्याच विरोधी नेत्यांनी आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फक्‍त त्याला “सामूहिक नेतृत्व’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे.

“आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी छोटे स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. त्यासाठी हवा तो त्याग करण्यास मी आणि माझा पक्षही तयार आहे’, अशी ग्वाही ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना दिली आहे, हेही महत्वाचे आहे. तिसऱ्या आघाडीची एकत्र येऊ पाहणाऱ्या या पक्षांची मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. गेली अनेक वर्षे आपापल्या राज्यात प्रभावी राजकारण करणाऱ्या या पक्षांनी प्रामुख्याने कॉंग्रेसशी लढत दिली होती. गेल्या 5 वर्षांच्या काळात भाजपचा प्रभाव वाढल्याने आता त्यांना भाजपशी संघर्ष करावा लागत आहे. ममता, चंद्राबाबू आणि चंद्रशेखर राव या सर्वानाच कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांशी संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना हा तिसऱ्या आघाडीचा पर्याय योग्य वाटत आहे. देशातील 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये आता भाजपची सत्ता आहे. डाव्यांचा गड असलेल्या राज्यांमध्येही आता भाजपची मुळे रूजू लागली आहेत, हे त्रिपुरातील सत्तांतराने सिद्ध केले आहे.

पश्‍चिम बंगालमध्येही भाजपने जोरदार तयारी केली आहे. ममता यांनाही दणका देण्याचा भाजपचा इरादा स्पष्ट आहे. “शत प्रतिशत’ भाजप हे उद्दिष्ट्‌य गाठण्यासाठी भाजप सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहे. शिवसेनेनेही महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपले प्रादेशिक गड राखण्याच्या प्रमुख उद्देशानेच या प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खूप पूर्वी व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीला सत्ताही मिळाली होती, हा इतिहास असल्यानेच प्रादेशिक पक्षांना बहुधा एकत्र यावेसे वाटत असेल; पण ही “तिसरी आघाडी’ भाजपला पराभूत करण्याएवढी सक्षम असेल का, याबात निश्‍चितच शंका आहेत.

कारण मतदारांना जेव्हा तीन पर्याय उपलब्ध असतात, तेव्हा समविचारी मतांची विभागणी होऊन भलत्याच पक्षाचा फायदा होतो, असे इतिहास सांगतो त्यामुळे ही “तिसरी आघाडी’ कॉंग्रेसला त्रासदायक आणि भाजपला लाभदायक ठरणार नाही ना, याचाही विचार करावा लागणार आहे. प्रादेशिक अस्मिता आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षेच्या काळात तिसऱ्या आघाडीतील घटक पक्षाची उद्दिष्टयेही संकुचित असल्याने, राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून या आघाडीकडे पाहता येईल का, याबाबत शंका आहेच. स्वतःचे स्वत:च्या राज्यातील स्थान मजबूत करण्याच्या नादात केंद्रात भाजपचे स्थान अधिक मजबूत होण्याचा धोका, या संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवा. अन्यथा करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी अवस्था सर्वच विरोधकांची व्हायची.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला आजच्या परिस्थितीत जर तिसरी आघाडी तयार झाली तर बीजेपी 100% जिंकणार हे त्रिवार सत्य आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)