तिरंगी लढतीत राष्ट्रवादी “बॅकफुट’वर

पिंपरी – शिरुर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दुरंगी लढत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच मंगलदास बांदल यांनी निवडणुकीत उतरण्याचा ठाम निर्णय घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे निश्‍चित झाले आहे. बांदल यांच्या उमेदवारीचा फटका राष्ट्रवादीलाच बसणार असल्यामुळे हा पक्ष शिरुर मतदारसंघात “बॅकफुट’वर जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या पंधरा दिवसांत जाहीर होणार असल्याने सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालविली आहे. युती आणि आघाडी झालेली असली तरी छोटे पक्ष कोणासोबत जाणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गतवेळी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत युतीसोबत असलेला रिपाई, स्वाभीमानी, रासप, शिवसंग्राम यांच्याबाबत युतीमधून अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही अथवा मतदारसंघाचे वाटपही झालेले नाही. शिवसेना आणि भाजप मात्र एकत्र लढणार हे निश्‍चित झाले आहे. तर अशीच परिस्थिती कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची आहे. हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार हे स्पष्ट झाले असले तरी मनसे, स्वाभीमानी, वंचित आघाडीबाबत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हे पक्ष युती आणि आघाडीसोबत जाणार की स्वतंत्र निवडणूक लढविणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे चित्र मात्र स्पष्ट आहे. गतवेळी हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे होता. सध्या शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या मतदारसंघाचे नेतृत्त्व करीत आहेत. तर मतदारसंघ पुनर्ररचनेनंतर दोनवेळा पराभूत झालेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. शिवसेनेकडून आढळराव हेच निवडणूक रिंगणार असणार हे निश्‍चित मानले जात आहे. तर राष्ट्रवादीकडून विलास लांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांनीही राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितल्याने या दोघांपैकी उमेदवारीमध्ये बाजी कोण मारणार यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

शिवाजीराव आढळराव या मतदारसंघाचे गेली 15 वर्षे नेतृत्त्व करीत आहेत. मात्र मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. भोसरी मतदारसंघाने आढळरावांना नेहमीच साथ दिलेली असताना या मतदारसंघाशी निगडीत आणि नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न जैसे थे आहेत. याच विरोधी वातावरणाचा फायदा उठविण्याच्या तयारीत विलास लांडे आहेत. आढळराव विरोधी वातावरणात आपण विजयी होवू अशी खात्री लांडे यांना वाटत आहे. मात्र बांदल यांनी तिकीट न मिळाल्यास अपक्ष अथवा इतर पक्षांच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय लांडे यांना अडचणीचा ठरणार आहे. त्यातच 2009 साली लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने लांडे यांचा झालेला पराभव, 2014 साली विधानसभा निवडणुकीतही झालेला दारुण पराभव आणि गेली साडेचार वर्षे लोकांपासून दूर राहणेच लांडे यांनी पसंद केल्यामुळे लोकसभा निवडणूक त्यांना सोपी जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

2009 साली राष्ट्रवादीचे विलास लांडे यांच्यासह 5 आमदार असतानाही त्यांना विजय मिळविता आला नव्हता. यावेळी तर पक्षाची अतिशय बिकट परिस्थिती आहे. राज्यात आणि केंद्रात नसलेली सत्ता, मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेचे वाढलेले आमदार आणि स्वत: विलास लांडे यांचा 2014 मध्ये झालेला पराभव लांडे यांना विजयापर्यंत कसा घेवून जाणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे. केवळ आढळराव यांच्याबाबत असलेल्या नाराजीच्या लाटेवरच मैदान मारण्याच्या तयारीत असलेल्या लांडे यांना सध्यातरी हा मतदारसंघ सोपा नसल्याचेच दिसून येत आहे.

निवडणूक लढविणारच – बांदल
लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आमचे कार्येकर्ते आग्रही असल्याने मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत आता माघार घेतली जाणार नसून राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीकडून तिकीटाची फारशी अपेक्षा नसून सातत्याने पराभूत झालेल्या आणि लोकांपासून दूर गेलेल्या विलास लांडे यांनाच राष्ट्रवादीचे तिकीट मिळेल असे मला वाटते. माझे इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मनसेचे राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांच्याकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशीही आपले चांगले संबंध आहेत. त्यांच्या पक्षाचीही आपल्याला उमेदवारीबाबत ऑफर आलेली आहे. ज्या पक्षाचे तिकीट मिळेल त्या पक्षाकडून निवडणूक लढविणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.

बहुजन आघाडीचा राष्ट्रवादीला फटका?
वंचित बहुजन आघाडीची एमआयएम या पक्षासोबत आघाडी असल्याने बहुजन, दलित आणि मुस्लीम मतांचा भरभक्कम पाठींबा या पक्षाच्या उमेदवाला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना तिकीट मिळाल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो हे निश्‍चित आहे. आतापर्यंत बहुजन, दलित आणि मुस्लिमांची एकगठ्ठा मते जी राष्ट्रवादीच्या पाठिशी होती ती मते बांदल यांना जाण्याची भिती आहे.

“त्यांच्या’ दोस्तीची धास्ती!
भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्याशी रामदास बांदल यांचे मैत्रीचे संबंध आहेत. आमदार लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांच्यात पॅचअप झाल्याची चर्चा सोईस्कररित्या पसरविण्यात आली आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. आमदार लांडगे समर्थकांनी शिरुरमधून भाजपला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे युती झाली असली तरी लांडगे समर्थक खासदार आढळराव यांच्याविरोधात काम करणार हे उघड सत्य आहे. दुसरीकडे विलास लांडे यांच्याशीही जुळवून घेण्याचे धोरण दिसत नाही. हीच परिस्थिती खासदार आढळराव व आमदार सोनवणे यांच्या बाबतीत आहे. हे दोघे एका व्यासपीठावर येत असले तरी त्यांचे एकमेकांशी फारसे सख्य नाही. त्यामुळे लांडगे-सोनवणे-बांदल यांच्या मैत्रीची धास्ती राष्ट्रवादीसह शिवसेनेलाही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)