तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; इंग्लंडला पराभूत करण्याचे महिला संघासमोर आव्हान

मुंबई  – स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून एकतर्फी पराभव पत्करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला तिरंगी मालिकेतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी उद्या (रविवार) होणाऱ्या दुसऱ्या लढतीत इंग्लंडच्या महिला संघाला पराभूत करण्याचे खडतर आव्हान पेलावे लागणार आहे. इंग्लंडच्या महिला संघाने काल झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाचा धुव्वा उडवीत तिरंगी मालिकेत विजयी सलामी दिली.

ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून सपशेल पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय महिला संघाला त्यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही क्षेत्रांमध्ये कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. भारतीय महिला संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना किंवा तळाच्या फलंदाजांनाही गेल्या काही दिवसांत पुरेशा धावा जमविता आलेल्या नाहीत. किंबहुना भारतीय महिलांच्या पराभवाचे तेच खरे कारण आहे.

त्यामुळेच वेदा कृष्णमूर्ती, हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार व संघातील सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राज यांना आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. सलग दुसरा पराभव झाल्यास भारतीय महिलांचे स्पर्धेतील आव्हान धोक्‍यात येऊ शकते. मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी गेल्या वर्षीच्या विश्‍वचषख स्पर्धेपासून बजावलेली कामगिरी डोळ्यात भरण्यासारखीच आहे. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर तिरंगी मालिकेतही भारतीय फलंदाजांच्या अपयशाचे कोणतेही समर्थन देता येणार नाही.

उपकर्णधार स्मृती मंधाना वगळता केवळ अनुजा पाटीलने धावा केल्या आहेत. परिणामी उद्याच्या सामन्यात अनुजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागण्याचीही शक्‍यता आहे. झूलन गोस्वामीने पुनरागमनात 3 बळी घेत आपले महत्त्व सिद्ध केले. परंतु तिकला दुसऱ्या बाजूने काहीच मदत मिळत नसल्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांचे फावते आहे. उद्या इंग्लंडला पराभूत करण्यासाठी शिखा पांडे व रुमेली धर या वेगवान गोलंदाजांसह पूनम यादव व दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांनाही कंबर कसून संघाला विजयाप्रत घेऊन जायचे आहे.

  नताली स्किव्हरच्या कामगिरीकडे लक्ष

इंग्लंडच्या नताली स्किव्हरच्या कामगिरीकडे उद्या सर्वांचे लक्ष राहील. नतालीने फलंदाजी व गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करताना इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच टॅमी ब्यूमॉंट या गुणवान खेळाडूची कामगिरीही निर्णायक ठरू शकेल. इंग्लंडच्या फलंदाजांनी काल ऑस्ट्रेलियाच्या फिड़की माऱ्याचा चांगला सामना केला होता. त्यामुळे पूनम यादव व दीप्ती शर्मा यांना इंग्लंडविरुद्ध नवी अस्त्रे शोधावी लागतील. त्याउलट इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजही भरात असून भारतीय फलंदाजांना सावधपणे धावा जमवाव्या लागणार आहेत.

प्रतिस्पर्धी संघ-
भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, एकता बिश्‍त, झूलम गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धर व मोना मेश्राम.

इंग्लंड महिला संघ- हीथर नाईट (कर्णधार), टॅमसिन ब्यूमॉंट, केट क्रॉस, ऍलिस डेव्हिडसन-रिचर्डस, सोफी एक्‍सेलस्टोन, टॅश फेरॅन्ट, केटी जॉर्ज, जेनी गन, अलेक्‍स हार्टली, डॅनिएली हॅझेल, ऍमी जोन्स (यष्टीरक्षक), ऍन्या श्रबसोल, नताली स्किव्हर, फ्रॅन विल्सन व डॅनिएली व्याट,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)