तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांवर मात करून ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

मुंबई – एकदिवसीय मालिकेतील वर्चस्व कायम राखणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिला संघावर सहा गडी राखून मात करीत येथे सुरू झालेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेत विजयी सलामी दिली. या तिरंगी मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ असून मालिकेतील सर्व सामने क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियन महिला संघाने एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांत भारतीय महिला संघावर एकतर्फी मात केली होती. त्याची पुनरावृत्ती करताना त्यांनी टी-20 प्रकारातही आपले वर्चस्व कमी होऊ दिले नाही. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा ऑस्ट्रेलियन महिला संघाचा निर्णय योग्य असल्याचे त्यांच्या गोलंदाजांनी दाखवून दिले व भारतीय महिला संघाचा डाव निर्धारित 20 षटकांत 5 बाद 152 धावांवर रोखला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाने केवळ 18.1 षटकांत 4 बाद 156 धावा फटकावून एकतर्फी विजयाची नोंद केली.

विजयासाठी 153 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची झूलन गोस्वामीने ऍलिसा हीली (4) व ऍश्‍ले गार्डनर (15) यांना बाद करीत लवकरच 2 बाद 29 अशी अवस्था केली. परंतु बेथ मूनी व एलिसे व्हिलॅनी यांनी तिसऱ्या विकेटसाठी 9.3 षटकांत 79 धावांची झुंजार भागीदारी करीत ऑस्ट्रेलियन महिला संघाचा डाव सावरला. केवळ 32 चेंडूंत 8 चौकारांसह 45 धावा करणाऱ्या बेथ मूनीलाही झूलननेच परतविले. पाठोपाठ 33 चेंडूंत 4 चौकारांसह 39 धावा करणाऱ्या व्हिलॅनीला पूनम यादवने बाद केले.

मात्र मेग लॅनिग व रॅचेल हेन्स यांनी त्यानंतर पाचव्या विकेटसाठी 5 षटकांत 34 धावांची अभेद्य भागीदारी करीत ऑस्ट्रेलियन महिला संघाचा विजय साकार केला. कर्णधार लॅनिंगने केवळ 25 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 35 धावा फटकावल्या. तर हेन्सने 9 चेंडूंत नाबाद 12 धावा करीत तिला साथ दिली. भारताकडून झूलन गोस्वामीने 30 धावांत 3 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली.

त्याआधी स्मृती मंधानाने केवळ 41 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह 67 धावा फटकावताना मिताली राजच्या (18) साथीत भारताला 72 धावांची सलामी दिली. परंतु अनुजा पाटील वगळता भारतीय महिला संघाच्या बाकी फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्या. अनुजाने केवळ 21 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 35 धावा फटकावताना वेदा कृष्णमूर्तीच्या (नाबाद 15) साथीत पाचव्या गड्यासाठी 41 धावांची बहुमोल भागीदारी करीत भारतीय गोलंदाजांना बचावासाठी किमान आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. ऑस्ट्रेलियन महिलांकडून ऍश्‍ले गार्डनरने 22 धावांत 2, तर एलिसे पेरीने 31 धावांत 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक-

भारतीय महिला संघ- 20 षटकांत 5 बाद 152 (स्मृती मंधाना 67, अनुजा पाटील 35, मिताली राज 18, वेदा कृष्णमूर्ती नाबाद 15, हरमनप्रीत कौर 13, ऍश्‍ले गार्डनर 22-2, एलिसे पेरी 31-2, डेलिसा किमिन्से 38-1) पराभूत विरुद्ध
ऑस्ट्रेलियन महिला संघ- 18.1 षटकांत 4 बाद 156 (बेथ मूनी 45, एलिसे व्हिलॅनी 39, मेग लॅनिंग नाबाद 35, रॅचेल हेन्स नाबाद 12, झूलन गोस्वामी 30-3, पूनम यादव 22-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)