तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान

मुंबई – दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातील चमकदार कामगिरीनंतर मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेत मात्र भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून 3-0 असा व्हाईट वॉश स्वीकारावा लागला. आता नव्याने सुरू होत असलेल्या तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेतील आज रंगणाऱ्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला संघासमोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन महिला संघाचेच आव्हान आहे.

या तिरंगी मालिकेत इंग्लंड हा तिसरा संघ असून मालिकेतील सर्व सामने क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील तीनही सामन्यांत भारतीय महिला संघाने एकतर्फी पराभवाची नामुष्की पत्करली असल्यामुळे नव्या आव्हानासाठी सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची खडतर कामगिरी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरवर आहे. अर्थात दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेत मिळविलेल्या 3-1 अशा विजयामुळे भारतीय महिला संघाला आत्मविश्‍वासाची कमतरता भासू नये.

एकदिवसीय मालिकेत सलग दोन अर्धशतके झळकावणारी सलामीवीर व उपकर्णधार स्मृती मंधाना ही भारतीय महिला संघातील सर्वोत्तम फलंदाज असून तिच्याकडून टी-20 मालिकेतही दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असणारी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुभवी मिताली राज यांच्याकडून भारताला फलंदाजीत मोठ्या अपेक्षा आहेत.

अर्थात वेदा कृष्णमूर्ती आणि अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांच्यासह धडाकेबाज युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडूनही भारतीय महिला संघाला धावांची अपेक्षा करता येईल. पूजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांची बहुमोल खेळी केली होती. तसेच तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अचानक सलामीची जबाबदारी पडल्यानंतरही जेमिमाने 42 धावांची आक्रमक केळी करीत आपला दर्जा दाखवून दिला होता.

अनुभवी झूलन गोस्वामी परतली असल्यामुळे एकदिवसीय मालिकेत निष्प्रभ ठरलेल्या भारतीय आक्रमणाला धार येईल अशी अपेक्षा आहे. तिच्यामुळे शिखा पांडेवरील भार हलका होऊ शकेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या दीप्ती शर्मा व पूनम यादव या फिरकी जोडीकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग वन डे मलिकेत चांगल्या प्रारंभानंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली होती. तिरंगी मालिकेत त्याची भरपाई करण्यास ती सज्ज असेल. तसेच अखेरच्या वन डे मध्ये शतकी खेळी करणारी ऍलिसा हीलीसुद्धा आपला फॉर्म कायम राखण्यास उत्सुक आहे. एकदिवसीय मालिकेत 8 बळी गेणारी डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासेनने भारतीय महिला फलंदाजांना चांगलेच सतावले होते. तिच्यासह आमांडा जेड व ऍश्‍ले गार्डनर या अन्य फिरकी गोलंदाजांपासूनही भारतीय महिलांना सावध राहावे लागणार आहे.

प्रतिस्पर्धी संघ-

भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), पूनम यादव, एकता बिश्‍त, झूलम गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धर व मोना मेश्राम.

ऑस्ट्रेलियन महिला संघ- मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स (उपकर्णधार), निकोला कॅरे, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हीली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी मॉलिन्यूक्‍स, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगॅन शुट, नाओमी स्टॉलेनबर्ग, एलिसे व्हिलॅनी व आमांडा जेड वेलिंग्टन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)