तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; इंग्लंडच्या महिला संघासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान

मुंबई – जोरदार प्रारंभानंतर साखळी फेरीच्या अखेरीस अचानक सूर गमावलेल्या इंग्लंडच्या महिला संघासमोर तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात कामगिरी उंचावलेल्या ऑस्ट्रेलियन महिलांचे कडवे आव्हान आहे. सलग दोन पराभव पत्करल्यामुळे बॅकफूटवर आलेल्या इंग्लंडच्या महिलांना उद्या (शनिवार) रंगणाऱ्या या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वारू रोखण्याची अवघड कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. भारतीय महिला संघाचे या मालिकेतील आव्हान सलग तीन सामन्यांतील पराभवामुळे साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे.

वास्तविक इंग्लंडच्या महिला संघाची मालिकेतील सुरुवात सनसनाटी होती. भारत व ऑस्ट्रेलियाच्या महिलांना सलग सामन्यांत पराभूत करताना इंग्लंडच्या महिलांनी भारताविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक लक्ष्याचा पाठलाग करून विक्रमी विजयाचीही नोंद केली. या अफलातून कामगिरीमुळे विजेतेपदासाठी पसंती देण्यात येत असलेल्या इंग्लंडच्या महिला संघातील फलंदाजांचा सूर अचानक हरवला आणि त्यांना अखेरच्या दोन साखळी सामन्यांमध्ये अनपेक्षित पराभवांना सामोरे जावे लागले.

उद्याच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्या गाठायची असेल, तर सलामीवीर डॅनिएली व्याटला मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. शिवाय तिला नताली स्किव्हर, टॅमी ब्यूमॉंट, तसेच कर्णधार हीथर नाईट यांच्याकडून मोलाची साथ मिळावी लागेल. अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी फलंदाजांना साथ देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ऍमी जोन्सलाही महत्त्वाची भूमिका निभावावी लागणार आहे.

अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाज भारतीय फिरकीसमोर सपशेल अपयशी ठरल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फिरकी माऱ्यासमोर, विशेष करून जेस जोनासेनविरुद्ध त्यांना सावध राहावे लागेल. तसेच आक्रमणात केटी जॉर्ज, टॅश फॅरेन्ट आणि अनुभवी जेनी गन यांच्यावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी राहील.

इंग्लंडच्या तुलनेत ऑसी महिला संघाने चढत्या क्रमाने कामगिरी केली आहे. त्यांचा संघही समतोल आहे. बेथ मूनी, ऍलिसा हीली, कर्णधार मेग लॅनिंग, एलिसे व्हिलॅनी, तसेच एलिसे पेरी या सर्व फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. त्यापैकी एखादी फलंदाज अपयशी ठड़ली, तरी बाकीच्या फलंदाज आव्हानात्मक दावसंख्या उभारू शकतात. मुख्य फलंदाज मेग लॅनिगलाही आता सूर गवसला असल्याने इंग्लंडसाठी ती धोक्‍याची घंटा आहे. वेगवान गोलंदाज मेगॅन शुट भरात असून इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी तिला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. तसेच मध्यमगती गोलंदाज डेलिसा किमिन्से, तसेच जेस जोनासेन व ऍश्‍ले गार्ड्रनर या स्पिनर्सकडून तिला प्रभावी साथ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षण हा ऑसी महिलांचा कच्चा दुवा असून उद्याच्या लढतीत सोडलेला एक झेलही निर्णायक ठरू शकेल.

  प्रतिस्पर्धी संघ-

ऑस्ट्रेलियन महिला संघ- मेग लॅनिंग (कर्णधार), रॅचेल हेन्स (उपकर्णधार), निकोला कॅरे, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हीली (यष्टीरक्षक), जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी मॉलिन्यूक्‍स, बेथ मूनी, एलिसे पेरी, मेगॅन शुट, नाओमी स्टॉलेनबर्ग, एलिसे व्हिलॅनी व आमांडा जेड वेलिंग्टन.

इंग्लंड महिला संघ- हीथर नाईट (कर्णधार), टॅमसिन ब्यूमॉंट, केट क्रॉस, ऍलिस डेव्हिडसन-रिचर्डस, सोफी एक्‍सेलस्टोन, टॅश फेरॅन्ट, केटी जॉर्ज, जेनी गन, अलेक्‍स हार्टली, डॅनिएली हॅझेल, ऍन्या श्रबसोल, नताली स्किव्हर, फ्रॅन विल्सन व डॅनिएली व्याट.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)