तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; इंग्लंडला नमवून भारतीय महिलांचा पहिला विजय

मुंबई – अंतिम सामन्यातील दोन्ही प्रतिस्पर्धी संघ याआधीच निश्‍चित झाले असल्यामुळे औपचारिक ठरलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिलांचा 8 गडी व 26 चेंडू राखून पराभव केला. भारतीय महिला संघाचा या तिरंगी मालिकेतील हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही साखळी सामन्यांत, तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या साखळी लढतीत पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांनी अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित केला आहे.

नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा इंग्लंडच्या महिलांचा निर्णय फसला. भारतीय महिला संघाच्या फिरकी गोलंदाजांनी 10 पैकी 9 बळी घेत इंग्लंडच्या महिलांचा डाव 18.5 षटकांत सर्वबाद 107 धावांवर गुंडाळत आपल्या संघाला वर्चस्व प्रस्थापित करून दिले. त्यानंतर उपकर्णधार स्मृती मंधानाचे वेगवान अर्धशतक आणि कर्णधार हरमनप्रीतच्या साथती तिने केलेल्या अखंडित भागीदारीमुळे भारतीय महिलांनी 15.4 षटकांत 2 बाद 108 धावा फटकावून एकतर्फी विजयाची नोंद केली. केवळ 21 धावांत 3 बळी घेणारी अनुजा पाटील सामन्याची मानकरी ठरली. राधा यादवने 16 धावांत 2, पूनम यादवने 17 धावांत 2, तर दीप्ती शर्माने 24 धावांत 2 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयासाठी 108 धावांच्या आव्हानासमोर मिताली राज केवळ 6 धावांवर, तसेच जेमिमा रॉड्रिग्ज 7 धावांवर परतल्यावर स्मृती मंधानाने हरमनप्रीतच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 10.3 षटकांत 60 धावांची अभेद्य भागीदारी करीत भारतीय महिलांचा विजय साकार केला. मंधानाने केवळ 41 चेंडूंत 8 टचौकार व 1 षटकारासह नाबाद 62 धावांची वेगवान खेळी केली. हरमनप्रीतने 2 चौकारांसह नाबाद 20 धावा करून तिला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक-

इंग्लंड महिला संघ- 18.5 षटकांत सर्वबाद 107 (डॅनिएली व्याट 31, ऍमी जोन्स 15, नताली स्किव्हर 15, अनुजा पाटील 21-3, राधा यादव 16-2, पूनम यादव 17-2, दीप्ती शर्मा 24-2) पराभूत विरुद्ध भारतीय महिला संघ- 15.4 षटकांत 2 बाद 108 (स्मृती मंधाना नाबाद 62, हरमनप्रीत कौर नाबाद 20, डॅनिएली हॅझेल 17-2), सामनावीर- अनुजा पाटील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)