तिरंगी टी-20 क्रिकेट मालिका; सलग तिसऱ्या पराभवाने महिलांचे आव्हान संपुष्टात

मुंबई  – बेथ मूनी आणि एलिसे व्हिलॅनी यांची शानदार अर्धशतके आणि मेगॅन शुटचा प्रभावी मारा यामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारतीय महिला संघावर 36 धावांनी दणदणीत मात करताना तिरंगी टी-20 क्रिकेट मालिकेच्या अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. त्याच वेळी सलग तिसऱ्या पराभवामुळे यजमान भारतीय महिला संघाचे मालिकेतील आव्हान संपुष्टात आले.

ऑस्ट्रेलियन महिला संघाची मध्यमगती गोलंदाज मेगॅन शुट ही टी-20 क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली. शुटने आपल्या पहिल्या व डावातील दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्मृती मंधानाला बाद केले, तर सहाव्या चेंडूवर मिताली राजचा महत्त्वाचा बळी घेतला. त्यानंतर आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दीप्ती शर्माला बाद करीत मेगॅन शुटने ऐतिहासिक हॅटट्रिकची नोंद केली. सामन्याची मानकरी हा पुरस्कार मेगॅन शुटलाच देण्यात आला.

भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु निर्धारित 20 षटकांत 5 बाद 186 धावा फटकावून ऑस्ट्रेलियन महिला संघाने अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली. त्यानंतर भारतीय महिलांचा डाव निर्धारित 20 षटकांत 5 बाद 150 धावांवर रोखून ऑस्ट्रेलियन महिला संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. भारतीय महिलांना या मालिकेत एकही विजय मिळविता आला नसून येत्या गुरुवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाची ही मालिका खंडित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहील.

भारतीय महिला संघाकडून अखेरच्या क्षणी सलामीला पाठविण्यात आलेली युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने केवळ 40 चेंडूंत 8 चौकारांसह 50 धावा फटकावल्या. दुसऱ्या बाजूने स्मृती मंधाना, मिताली राज व दीप्ती शर्मा बाद झाल्यावर जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (33) साथीत 65 धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. या दोघी लागोपाठ परतल्यावर अनुजा पाटीलने 26 चेंडूंत 6 चौकारांसह नाबाद 38 धावा फटकावताना पूजा वस्त्रकारच्या (नाबाद 18) साथीत 53 धावांची अखंडित भागीदारी करीत विजयासाठी झुंज दिली. परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
त्याआधी बेथ मूनीने 46 चेंडूंत 8 चौकारांसह 71 धावा फटकावताना एलिस व्हिलॅनीच्या साथीत 114 धावांची शानदार भागीदारी करीत ऑस्ट्रेलियन महिला संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. व्हिलॅनीने 42 चेंडूंत 10 चौकारांसह 61 धावांची वेगवान खेळी केली. भारतीय महिलांकडून पूजा वस्त्रकारने 28 धावांत 2 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली.

      संक्षिप्त धावफलक-

ऑस्ट्रेलियन महिला संघ- 20 षटकांत 5 बाद 186 (बेथ मूनी 71, एलिसे व्हिलॅनी 61, पूजा वस्त्रकार 28-2) वि.वि. भारतीय महिला संघ- 20 षटकांत 5 बाद 150 (जेमिमा रॉड्रिग्ज 50, अनुजा पाटील नाबाद 38, हरमनप्रीत कौर 33, पूजा वस्त्रकार नाबाद 19, मेगॅन शुट 31-3, डेलिसा किमिन्से 27-1, ऍश्‍ले गार्डनर 24-1).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)