तिन्ही एसटी स्थानकांचे विभाजन?

वाढत्या वाहतूक कोंडीवर उतारा शोधण्यासाठी चाचपणी

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यात प्रामुख्याने स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील बसस्थानकांचे विभाजन करण्यासाठी महामंडळाने तयारी दर्शवली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर बसस्थानकाचे विभाजन करण्यात येणार आहे. पर्यायी जागा म्हणून कृषी महाविद्यालयाच्या जागेची निवड करण्यात आली आहे. तर येरवडा येथेही जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. तर, उर्वरीत दोन स्थानकांचे टप्प्याटप्प्याने विभाजन करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन ही बसस्थानके शहराच्या मध्यवस्तीत आहेत. शिवाजीनगर येथून नागपूर, अमरावती, अकोला, जळगांव, लातूर, नगर, बीड, नाशिक, मुंबईसह इतर राज्यांतही बसेस सोडल्या जातात. यातील काही बसेस पुढे पुणे स्टेशन येथे थांबतात. तसेच मुंबईसह अन्य शहरांसाठीही पुणे स्थानकावरुन बसेस सोडल्या जातात. पण, येथून जाणाऱ्या बसेसची संख्या कमी असली, तरी तेथे प्रचंड वाहतूक कोंडी होते.

स्वारगेटदेखील वर्दळीचे बसस्थानक आहे. येथून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोकणासह कर्नाटकातील काही शहरांसाठी बसेस जातात. ही सर्व बसस्थानके शहराच्या मध्यवस्तीतच असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे या स्थानकांचे स्थलांतर करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिसांनी एसटीला दिला होता. मात्र, जागांच्या अभावी या स्थलांतराला मूहूर्त मिळत नव्हता. महामंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानुसार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याशिवाय राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान वर्षभराचा वेळ लागणार आहे. त्यानंतर अन्य दोन स्थानकांचे विभाजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले, “संबंधित कार्यालयाने याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाला सादर केला आहे. त्याबाबत मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि संबधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.’

असे होणार बसस्थानकांचे विभाजन
प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळावी आणि वाहतूक कोंडीही कमी व्हावी, यासाठी सर्वच बसस्थानकांचे दोन भाग करण्याचा महामंडळ गांभीर्याने विचार करत आहे. त्यानुसार शिवाजीनगर बसस्थानक जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाच्या आणि येरवडा येथील पर्यायी जागेत हलविण्यात येणार आहे. तर स्वारगेट बसस्थानकाच्या स्थलांतरासाठी शंकरशेठ रस्त्यावरील महामंडळाची जागा आणि कात्रज येथील जागा निश्‍चित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)