तिढा सुटला मात्र निर्णयांची अंमलबजावणी होणार का ?

एकरक्कमी एफआरपीकडे शेतकऱ्यांच्या नजरा
संघटना अन प्रशासनाला रहावे लागणार सतर्क

सम्राट गायकवाड 

-Ads-

सातारा,दि.12 – स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दरवर्षीप्रमाणे ऊस दरासाठी यंदाच्या वर्षी ही आंदोलनात्मक भूमिका घेतली. मात्र, यंदाच्या वर्षी आंदोलन सुरू होण्यापुर्वीच ऊस दरावर सकारात्मक तोडगा निघाला खरा परंतु कारखानदारांनी दिलेल्या कमिटमेंटची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार का, याकडे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ऊस दरासाठी दरवर्षी आंदोलन; ही संघटना कार्यकर्ते, पोलीस प्रशासन आणि माध्यमांना नित्याची बाब झालेली होती. परंतु ऊस आंदोलनाच्या इतिहासात यंदाच्या वर्षी आंदोलन सुरू होताच दुसऱ्या दिवशी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ऊस दरावर तोडगा काढण्यात आला. तर त्या पाठोपाठ तिसऱ्या दिवशी साताऱ्यात प्रशासनाने पुढाकार घेतल्यामुळे आंदोलन उग्र होण्याआधीच बैठकीचे आयोजन करण्यात आल्यामुळे तोडगा निघाला. बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे कायद्यानुसार ऊस नेल्यापासून 14 दिवसात एकरक्कमी एफआरपी देण्यात येणार आहे. हा निर्णय कागदावर झाला असला तरी खऱ्या अर्थाने 14 दिवसात एकरक्कमी एफआरपी कारखाने देणार का? याकडे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. कारण, एफआरपीचा कायदा अंमलात आल्यापासून एखाद, दुसरा कारखाना वगळता इतर कारखान्यांनी 14 दिवस सोडाच उलट अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर बिले अदा केली आहेत. तर किसनवीर कारखान्याने कायदेशीर कारवाईच्या बडगा आणि शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर ऊस ऊत्पादकांना बिले दिली आहेत. तसेच अद्याप ही काही शेतकऱ्यांना मागील हंगामातील बिलातील फरक येणे बाकी असून पैसे उपलब्ध झाल्यानंतर ती रक्कम दिली जाईल, असे त्यांच्या कारखान्याच्या प्रतिनिधीने काल झालेल्या बैठकीत सांगितले. त्याचप्रमाणे इतर कारखान्यांनी देखील मागील वर्षातील देणी बाकी ठेवली असून त्यांना ती येत्या महिनाभरात द्यावी लागणार आहेत.

पार्श्‍वभूमीवर आता जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी गाळप सुरू करून दहापेक्षा अधिक दिवसांचा कालावधी उलटला आहे. साहजिकच शेतकऱ्यांनी 11 दिवसांपुर्वी ऊस दिल्यामुळेच हे गाळप सुरू झाले आहे. परिणामी एफआरपीच्या कायद्यानुसार त्या शेतकऱ्यांना येत्या पाच ते सहा दिवसात एकरक्कमी एफआरपीची रक्कम अदा करावी लागणार आहे. त्यामुळे आता ते कारखाने शेतकऱ्यांना येत्या दिवसात एकरक्कमी एफआरपी अदा करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण, एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय खुद्द कारखानदार प्रतिनिधींनी मान्य केला असून काल झालेल्या बैठकीत तसा शब्द त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व संघटना प्रतिनिधींना दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये गाळपास नेलेल्या ऊसाची एकरक्कमी एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली नाही तर पुन्हा एकदा शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. परिणामी जिल्हाधिकार व पोलीस अधिक्षकांनी बैठकीत झालेल्या निर्णयावर समाधानी न राहता हंगाम संपेपर्यंत कारखानदारांच्या मागे कायद्याचा दंडुका उभा ठेवणे गरजेचे आहे.

अन्यथा खा.शेट्टींच्या उपस्थितीत होणार बैठक
प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत कारखानदारांनी एकरक्कमी एफआरपी 14 दिवसात आणि मागील देणी एक महिन्याच्या आत देण्याचे मान्य केले आहे. त्या निर्णयावर आम्ही आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आता येत्या काही दिवसांमध्येच कारखानदारांना एफआरपीप्रमाणे पैसे खात्यात जमा करावेच लागणार आहेत. मात्र, त्यांनी त्या पध्दतीने अंमलबजावणी जर केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीतच बैठकीचे आयोजन करून कारखानदार व प्रशासनाला जाब विचारण्यात येईल, अशी प्रतिक्रिया संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली.

रयत क्रांतीने ठेवला होल्ड
दरम्यान, खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलना दरम्यान प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकांना ना.सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. केवळ उपस्थित न राहता रयत क्रांतीचे संजय भगत यांनी सर्व बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या बाजुने भूमिका मांडत साखर कारखानदार व प्रशासनावर खास शैलीत शाब्दिक टिप्पणी ही केली. एकूणच संवादातून संघर्षाकडे या घोषवाक्‍याप्रमाणे रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी न होता प्रश्‍न सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य ठरले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)