तिकोणा गडावर “संवर्धनाची गुढी’!

  • गडभटकंती ग्रुपचा पुढाकार : गडावर वर्षभर सण-उत्सवाची रेलचेल

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील गडभटकंती ग्रुपच्या मावळ्यांनी किल्ले तिकोनागडावर नवचैतन्याची गुढी उभारली. गडकिल्ल्यांवर गुढी उभारण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असल्याने गुढी उभारण्यासाठी मावळातील शिवप्रेमींनी चांगलीच गर्दी केली.

हिंदू नववर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा. निसर्गात नवीन चैतन्य, नवीन पालवी फुटण्याची ही वेळ असते. अशा वेळी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले मात्र त्यापासून बिनकल राहत आहेत. त्यामुळे वडगाव मावळ येथील मावळ्यांनी हा गुढी उभारण्याचा उपक्रम हाती घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व गडांवर वर्षभरातील सर्व सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरे होत असत. मात्र शिवकाळाबरोबर या सर्व सण-उत्सवांना जणू ग्रहणच लागलं. सगळे गड-किल्ले या उत्सवांच्या आठवणीत राहू लागले. सध्या बहुतांश गडांवर दगड व भिंतींशिवाय काहीही उरले नाही. त्यामुळे सध्या जे आहे, त्याचे रक्षण करणे ही प्रत्येक शिवप्रेमींचे प्रथम कर्तव्य आहे. या भावनेतून पाडव्यापूर्वी दोन दिवसांपासून गुढीपाडव्याची तयारी सुरु झाली. वडगाव मावळ येथील शिवरायांचे मित्र वीर नारो बापूजी देशपांडे यांच्या समाधीपूजनाने गुढी पाडवा उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीमंत महादजी शिंदे यांच्या स्मारकाला दूध अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर सर्व मावळ्यांनी तिकोना गडाकडे कूच केली.

तिकोना गडावर चढताना मार्गातील वेताळ महाराज, चपेटदान मारूतीराया, तळजाई माता यांचे पूजन करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील वितंडेश्‍वर मंदिरात पूजा करून परंपरेप्रमाणे गुढी उभारण्यात आली. गडाच्या महादरवाजावर फुलांची सजावट करून फुलांच्या माळा तटबंदी बुरुजावरून खाली आल्या. काही वेळातच महादरवाजा बुरुजांसकट फुलांनी सजून गेला. रांगोळ्यांची आरास झाली. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाला आणि तिकोनागडावर शिवशाही अवतरल्याचा अनुभव आला. स्वराज्याचा भगवा ध्वज बदलण्यात आला. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते गडाच्या महादरवाज्यात गुढी उभारण्यात आली.

गूळ, कडुलिंबाची फुले यांचा प्रसाद वाटण्यात आला. तळजाई मंदिराच्या प्रांगणात सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तिकोनागड गुडीपाडवा उत्सवात सहभागी झालेल्या सर्वानी याचा लाभ घेतला. तसेच गडसंवर्धनाच्या कामात मदत करत गडावरील झाडांना पाणी घालण्यात आले. या आनंदी क्षणाचे साक्षीदार झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तरळत होते. यावेळी वडगाव मावळ येथील जाहिरात व्यवसायिक, दुर्गसेवक अतुल राऊत यांनी गडावर करण्यात येत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी पाच हजार रुपयांचा मदत निधी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)