तासिका तत्वावरील प्राध्यापकांना दिलासा

मानधनात दुप्पट वाढ : शासनाकडून निर्णय घेतांना काही जाचक अटीही

पुणे – राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांतील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या (अध्यापक) मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना शासनाने जाचक अटीही लागू केल्या आहेत.

-Ads-

राज्यात महाविद्यालय आणि विद्यार्थी संख्या यांच्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबरोबर महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या समस्याही वाढल्या आहेत. सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे भरावीत, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवावे आदी मागण्या विविध संघटनांकडून होत होत्या. यासाठी आंदोलनेही केली आहेत. त्याचीच दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सहायक प्राध्यापकांच्या रिक्त पदांच्या भरतीवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय 3 नोव्हेंबर 2018 रोजी घेतला आहे. त्यानंतर उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधन दरामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा आदेशही बुधवारी (दि.14) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी हे.पं.बाविस्कर यांनी जारी केला आहे. 5 नोव्हेंबर 2008 पासून जून्या दराप्रमाणेच प्राध्यापकांना मानधन देण्यात येत होते. यात आता दुप्पटीने वाढ केली आहे. मात्र, प्रात्यक्षिकांच्या तासांच्या मानधनात प्रति तासांसाठी पन्नास ते शंभर रुपये एवढीच वाढ केली आहे.

पदवीस्तरावर कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसाठी सैद्धांतिकला पूर्वी प्रति तासासाठी 300 रुपये मानधन होते. ते आता 500 रुपये केले आहे. तर प्रात्यक्षिकांसाठी पूर्वी प्रति तासाकरीता 150 रुपये होते. ते आता केवळ 200 रुपये करण्यात आले आहे.पदव्युत्तर स्तरावर सैद्धांतिकसाठी प्रति तासाला पूर्वी 300 रुपये मानधन होते. ते आता 600 रुपये केले आहे. प्रात्यक्षिकांसाठी प्रति तासाला पूर्वी 150 रुपये होते. ते आता वाढवून 250 रुपये करण्यात आले आहे.

शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण व विधी अभ्यासक्रमाकरिता (पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) सैद्धांतिकला पूर्वी प्रति तासासाठी 300 रुपये मानधन होते. ते आता 600 रुपये केले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिकांकरीता प्रति तासाला पूर्वी 150 रुपये मानधन होते. ते आता प्रति तासाला 250 रुपये प्रमाणे करण्यात आले आहे.

प्राध्यापकांना आठवड्याला जास्तीत जास्त केवळ 9 तासिकाच घेता येणार असल्याने महिन्याला सरासरी 36 पर्यंतच तासिका घेता येणार आहेत. यामुळे तासिका तत्वावर दरमहा 18 हजार ते 22 हजार रुपयांपर्यंतच मानधन मिळणार आहे.

11 अटींची पूर्तता करावी लागणार
शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला असला तरी यासाठी 11 अटी लागू केल्या आहेत. यातील बऱ्याचशा जाचक आहेत. तासिका तत्वावर प्राध्यापकांची नियुक्ती करण्यापूर्वी उच्च शिक्षणाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयातून संबंधित विषयाचा कार्यभार तपासून ना-हरकत प्रमाणपत्र घेण्याचे बंधनही संस्थांना लागू राहणार आहे. शैक्षणिक संस्थेने विद्यापीठाची मान्यता घेऊन जाहिरात देऊन स्थानिक निवड समितीमार्फत उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. एका पूर्णवेळ रिक्त पदासाठी फक्त दोनच प्राध्यापकांच्या नेमणूका करण्यात येणार आहे. एका प्राध्यापकाकडे आठवड्याला जास्तीत जास्त नऊ तासिकांचाच कार्यभार सोपविता येणार आहे. प्राध्यापकाची नियुक्ती ही एका शैक्षणिक वर्षातील नऊ महिन्यांसाठीच असणार आहे. भविष्यात सेवेत कायम करण्यासाठी कोणत्याची हक्‍काची मागणी करणार नाही, असे हमीपत्रही शंभर रुपयांच्या स्टॅंपपेपरवर द्यावे लागणार आहे. एकावेळी एकाच महाविद्यालयात काम करता येणार आहे. दरमहा मानधन हे सेवार्थ प्रणालीमार्फतच अदा करावे लागणार आहे. अनुभव संपन्न व्यक्तींना व्याख्यानासाठी बोलवता येईल, मात्र त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने निमंत्रित करता येणार नाही. या विविध अटींच्या अधिन राहूनच सुधारित दर मंजूर होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)