तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ कधी?

दहा वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम; आंदोलनाचा इशारा; शासनाला मुहूर्त सापडेना

पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षक गेल्या 10 वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. शिक्षण विभागाने मानधन वाढीचा प्रस्ताव 2 वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. शिक्षण विभाग व शिक्षक संघटना यांना प्रस्तावाच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्याचा विसरच पडला आहे. प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शासनाला मुहूर्त कधी सापडणार? असा प्रश्‍न सध्या शिक्षकांकडूनच उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

-Ads-

राज्य शासनाने वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील सहाय्यक प्राध्यापकांचे मानधन दुप्पटीने वाढविण्याचा नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला. यामुळे आता कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधन वाढीचा विषय पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

राज्यात सुमारे 3 हजार 500 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. अनेक वर्षे शिक्षक भरती रखडल्यामुळे या महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिक्षकांच्या नेमणुका करून कामे मार्गी लावण्याची परंपरा बऱ्याच वर्षांपासून कायम ठेवण्यात आली आहे. आता तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या 4 हजार 500 पर्यंत पोहचली आहे.

तासिका तत्त्वावरील शिक्षकांना अगदी सुरुवातीच्या काळात केवळ प्रति तास 20 रुपये एवढे मानधन अदा केले जात होते. त्यात शासनाकडून सन 2008 मध्ये प्रति तास 50 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे प्रति तास 72 रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येऊ लागले. त्यानंतर आजतागायत या दराप्रमाणे मानधन देण्यात येत आहे. मानधन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने बऱ्याचदा आंदोलने केली. शासनाला निवेदनेही दिली. मात्र अद्याप शासनाकडून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून सन 2015 मध्येही मानधन वाढीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाला पाठविण्यात आला होता. त्यानंतर 25 एप्रिल 2016 रोजी तत्कालीन शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी प्रति तास 72 रुपयांऐवजी प्रति तास 125 रुपये प्रमाणे सुधारित मानधन वाढीबाबतचा प्रस्ताव पुन्हा शासनाकडे पाठविला. यावर शासनाकडून अद्याप काहीच निर्णय जाहीर झालेला नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत असल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह भागविणे कठीण बनू लागले आहे. शिक्षकांची अवस्था वेठबिगारीसारखी झाली आहे. महाविद्यालयात पडेल ती सर्व कामे करावी लागतात. या कामांच्या अतिरिक्‍त ताणामुळे बऱ्याचदा त्रासही होतो. शिक्षकांच्या नोकरीबरोबरच आता शेतात किंवा इतर ठिकाणी मिळेल ती मजुरी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शासनाने आधी शिक्षकांच्या आर्थिक प्रगती सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशा संतप्त भावना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांकडून व्यक्‍त करण्यात येऊ लागल्या आहेत. संघटनांचे पदाधिकारी स्वत:च्या महाविद्यालयांचेच विषय मार्गी लावण्यात व्यस्त असतात. त्यामुळे संघटनेकडून व शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मंजुरीसाठी पुरेसा पाठपुरावाच करण्यात आलेला नाही. त्यामुळेच प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला असल्याबाबतचे म्हणणे शिक्षकांकडून मांडण्यात येत आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
सहाव्या वेतन आयोगानुसार तासिका तत्त्वावरील शिक्षकांना प्रति तास 250 रुपये एवढे मानधन मिळावे, अशी मागणी आधी करण्यात आली होती. आता सातव्या वेतन आयोगानुसार प्रति तास 500 रुपये प्रमाणे मानधन मिळावे यासाठी शासनाकडे आग्रह धरण्यात येणार आहे. एक-दोन वर्षांपासून रखडलेले मानधन शिक्षकांना मिळवून देण्यात यश मिळाले आहे. शासनाकडून मानधन वाढीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष फाजगे यांनी दिला आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा करणार
तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधन वाढीचा एकही प्रस्ताव माझ्या कालावधीत शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही. माझ्या आधीच दोन वेळा प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र या प्रस्तावावर शासनाकडून काहीच निर्णय झालेला नाही व कोणत्याही कार्यवाहीचे आदेश आम्हाला अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. जुना प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशाचे सतत पालन करण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)