तारुण्य-वार्धक्य बेरीज की वजाबाकी!

संध्याकाळी नेहमीप्रमाणे 5-5.30 ला घराबाहेर पडले की थोडे चालल्यावर येणाऱ्या एका इमारतीमधून एक वयस्कर जोडपे हमखास भेटतात. दोघांचे वय अंदाजे 80 च्या पुढे नक्कीच असेल. अतिशय संथपणे चालत चालत ते फक्त अगदी कोपऱ्यापर्यंत जातात. तिथे बाक आहेत. तिथे अर्धा तास बसतात आणि असेच हळूहळू रस्त्याच्या कडेने परत येतात. दोघांनीही आधारासाठी एकमेकांचा हात धरलेला असतो. आता या वयात एकमेकांचे हात धरून चालायचे ते फक्त आधारासाठी आजी रोज पंजाबी ड्रेसमध्ये तर आजोबा अगदी व्यवस्थित कपडे घालून तयार होऊन बाहेर पडतात. त्यांना रोज पाहून मला प्रत्येकाच्याच आयुष्यात येणाऱ्या किंवा येऊ घातलेल्या या काळाची म्हणजे वार्धक्‍याची प्रकर्षाने जाणीव होते आणि प्रत्येक व्यक्तीने हा काळ कशा पद्धतीने घालवावा याचे नियोजन करावे असे वाटते.

संसाराची सुरुवात झाल्यानंतर तरुणपणीचा काळ, आणि त्यानंतरचा मध्यमवयीन काळ म्हणजे साधारणपणे 50-55 वर्षांर्पंतचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यातील गतीमान काळ असतो. ही सारी वर्षे संसाराची जबाबदारी निभावताना, नोकरी किंवा व्यवसाय करताना कशी संपतात हे देखील कळत नाही. त्यामध्ये मुलांचे संगोपन, त्यांची शिक्षणे, लग्नकार्ये, नोकऱ्या यामध्ये इतके आपण इतके गुरफटून जातो की दिवसाचे 24 तासही कमी वाटायला लागतात आणि मग हळूहळू सर्व स्थिरस्थावर होऊ लागले आणि जीवनाला थोडे स्थैर्य येते. मुलांची शिक्षणे संपून ते नोकरीनिमित्त परगावी किंवा परदेशी जातात. लग्ने होऊनही सून किंवा जावई हे लांब असल्याने वर्षाकाठी कधीतरी भेटतात. साधारणपणे या प्रमाणे 60 वर्षांपर्यंत मुलाबाळांबरोबर गजबजलेल्या घरात राहणारी ही घरे आता मोठी असतात. पण रिकामी होतात. त्यातील पिले पंख पसरून उंच भरारी घेण्यासाठी बाहेर पडलेली असतात. मग उरतात त्या फक्त दोन व्यक्ती- आई आणि बाबा, जी शरीराने आणि मनानेही आता थोडी थोडी थकलेली असतात.

-Ads-

या दोन व्यक्तीच सुरुवातीलाही असतात आणि शेवटीही उरतात. मध्ये होणारा सर्व संसार हा एखाद्या स्वप्नासारखा सरतो. पण खरंच हा काळच खूप महत्त्वाचा आहे. इतकी वर्षे एकत्र राहिल्याने दुसऱ्याच्या सवयी, आवडी निवडी, यांची इतकी सवय झालेली असते. पण एकमेकांना समजून घेतले तर हा काळ आनंददायी होऊ शकतो. शारीरिक उणिवा किंवा कमतरता, छोटे मोठे आजार आता अविभाज्य झालेले असतात. गुडघेदुखी, पाठदुखी, मधुमेह, डोळ्यांना कमी दिसणे, ऐकू कमी येणे या गोष्टींनी आता शरीराचा ताबा घेतलेला असतो. पण तरीही हे सर्व सांभाळूनही मनाचा आजार होऊ द्यायचा नाही. मन आणि विचार सकारात्मक ठेवले तर यावर मोठी मात करता येते.

आपले मन ज्यामध्ये रमेल असे पर्याय शोधणे गरजेचे असते. मग ते वाचन असो, संगीताचा कार्यक्रम असो किंवा बागेत जाऊन बसणे असो. यामध्ये दोघांनीही एकमेकांना मदत करायला हवी. चालण्याचा पर्याय उपलब्ध नसेल तर हल्ली गाडी किंवा रिक्षा भाड्याने घेऊन जाता येते. समवयस्क मंडळींमध्ये रमावे. पण फक्त प्रत्येकाने मी कसा एकटा आहे असे रडगाणे गावू न नये. उलट एकमेकांना अडचणीच्या काळात, आजारपणात जमेल तरी आणि तेवढी मदत करावी. झेपेल एवढा प्रवास करावा, पोटाला सोसेन तेवढे हॉटेलिंग करावे. पण घरात कुढत बसू नये. हल्ली घरात टीव्हीचा पर्याय असतो पण बाहेर पडल्यावर जरा माणसांशी संपर्क येतो, स्वच्छ हवा मिळते आणि शरीराला आणि मनाला फ्रेश वाटते. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार हा काळ आपल्या पद्धतीने पण आनंदात घालवावा. हल्ली ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप सुविधा उपलब्ध आहेत. क्‍लब आहेत, बागा आहेत. प्रवासात सवलत आहे, लायब्ररी आहेत, गाण्याचे कार्यक्रम, नाटक सिनेमा आहेत, आपल्याला आवडणारे मित्र जमवावेत आणि सुखात रहावे. पैलतीर दिसतो आहे म्हणून पोहोण्याचे सोडू नये. पोहत पोहत त्या तीरावर आनंदांत पोचायचे हे प्रत्येकांनी आपापले ठरवावे.

– आरती मोने 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)