तारीक अन्वर पुन्हा कॉंग्रेसमध्ये 

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले तारीक अन्वर यांनी घरवापसी केली असून त्यांनी आज पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते बिहारमधील कटिहार मतदार संघातील खासदार आहेत. तथापी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर लगेचच खासदारकीचाही राजीनामा दिला आहे.
अन्वर यांनी शरद पवार आणि पी. ए. संगमा यांच्या समवेत सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरीकत्वाचा विषय उपस्थित करून 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये बंड केले होते. त्यानंतर या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नावाचा वेगळा राजकीय पक्षही काढला होता. त्या घटनेनंतर 19 वर्षांनी अन्वर हे पुन्हा कॉंग्रेस पक्षात परतले आहेत. कॉंग्रेसमध्ये असताना ते तत्कालिन अध्यक्ष सीताराम केसरी यांचे कट्टर समर्थक होते. त्यांनी कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही याआधी काम केले असून राष्ट्रीय पातळीवरील ते कॉंग्रेसचे एक महत्वाचे नेते मानले जात होते. युपीए सरकारच्या काळात त्यांना कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगाचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.
दरम्यान, राफेलच्या किमतीवरून लोकांच्या मनात संशयाची भावना नाही, असे विधान शरद पवार यांनी केले होते. ही बाब अन्वर यांच्या जिव्हारी लागली होती. यानंतर त्यांनी लगेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. तारिक अन्वर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांना धक्का बसला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)