तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोने लंपास

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील प्रकार : शाहूपुरी पोलीसांत फिर्याद


कसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर गुन्हा दाखल

कोल्हापूर – तारण ठेवलेले एक किलोहून अधिक सोन्याचे दागिने परस्पर बदलून 32 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावड्याचा शाखाधिकारी, रोखपालासह सराफावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

याबाबतची फिर्याद बॅंकेचे तपासणी अधिकारी रामगोंडा भुजगोंडा पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील, रोखपाल परशराम कल्लाप्पा नाईक आणि सराफ सन्मुख आनंदराव ढेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतून शिये इथं राहणाऱ्या वंदना मोरे यांनी सोने तारण कर्ज घेतले होते. त्या आठ दिवसांपूर्वी कर्जफेडीसाठी बॅंकेत गेल्या. त्यावेळी त्यांना तारण ठेवलेले सोने देण्यात आले. ते सोने आपले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यांच्या या तक्रारीनंतर ते सोने बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी तपासून घेतले. त्यावेळी ते सोने बनावट असल्याचे पुढे आले.

या प्रकरणी बॅंकेतर्फे शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांच्याकडून सुरू होती. बॅंकेकडूनही सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली. या काळात बॅंकेचे शाखाधिकारी संभाजी पाटील, रोखपाल परशराम नाईक होते. तारण जिन्नसाची तपासणीचे काम सराफ सन्मुख ढेरे याच्याकडे होते. सोने तारण कर्ज प्रकरणांची पडताळणी रामगोंडा पाटील यांनी केली. त्यात त्यांना एप्रिल 2017 ते 11 जून 2018 अखेर सोने तारण केलेल्या प्रकरणात घोळ दिसला. तारण ठेवलेल्या एकूण एक किलोहून अधिकचे सोन्याचे दागिने परस्पर बदलून त्या जागी बनावट जिन्नस ठेवून खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे तब्बल 32 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतील सोने तारण कर्जातील बनावट सोने प्रकरणातील संशयित शाखाधिकारी संभाजी शंकर पाटील (शिये, ता. करवीर) व कॅशिअर परशराम कल्लाप्पा नाईक (साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) यांना बॅंकेने निलंबीत केले आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखेतील सोन्याची तपासणी झाल्यावर प्रत्यक्षात आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)