ताम्हिणी घाटात मिनी बस कोसळली

दोघांचा मृत्यू : 22 जण जखमी : कोणात सहलीसाठी निघाले होते

पौड/पिरंगुट- पुणे-कोलाड महामार्गावरून कोकणात सहलीसाठी निघालेल्या खासगी मिनीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच तर एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू तर बसमधील इतर 22 जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाला. अपघात झालेले सर्वजण पुण्यातील नवी पेठ, सांगवी परिसरात राहणारे असून ते सर्वजण एकमेकांचे नातेवाईक आणि मित्र आहेत.

संजीवनी निवृत्ती साठे (वय 55, रा. औंध पुणे), योगेश पाठक (रा. नवी पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आर्य जयेश केळकर (वय 16, रा. वारजे, पुणे यांनी पौड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

पौड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की, शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्य सुमारास पुण्याहून मिनी बस (एमएच 12 केक्‍यू 6768) मधून 25 प्रवासी कोकणात पर्यटनासाठी निघाले होते. पहाटे अडीचच्या सुमारास ताम्हिणी गावचे हद्दीत बस आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने वाघूरनेचा ओढ्यामध्ये बस पुलावरून खाली 20 ते 25 फूट कोसळून अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर 24 जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी 3 जण मुळशी हॉस्पिटल लवळे फाटा येथे आयसीयुमध्ये तर इतर जखमींवर औंध हॉस्पिटल व पौड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पौड पोलिसांनी वेळेवर पोहोचुन मदत कार्य केले आहे. पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.

  • अपघातातील जखमींची नावे;
    पूनम योगेश लांडे, हर्षवर्धन योगेश लांडे, दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋषिकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सूर्यवंशी, रेश्‍मा प्रशांत जाधव, पुष्पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, निवृत्ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, योगेश पाठक, विधिता जाधव, श्रावणी पाठक तर वाहनचालक (नाव समजले नाही) हे जखमी झाले आहेत. यातील लहान मुलांना किरकोळ मार लागला असून बाकी सुखरुप आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)