ताम्हाणवाडी तलावात अवैध वाळू उपशावर महसूलचा छापा

यवत- दौंड तालुक्‍याच्या पश्‍चिमेस असलेल्या ताम्हाणवाडी येथील तलावात अवैधरित्या बिगर परवाना वाळू उपशावर शुक्रवारी (दि. 29) महसूल विभागाने छापा टाकत वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत एक ट्रॅकटर आणि एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले आहे. यातील पोकलेन पोलीस-पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला असून ट्रॅक्‍टर यवत येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी लावण्यात आला आहे. बिगर परवाना वाळू उपसा केल्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
या ठिकाणच्या तलावात अनेक दिवसांपासून वाळूमाफीया खुलेआम आणि राजरोसपणे वाळू उपसा करीत होते. या ठिकाणी वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा मारत ही कारवाई केली. या कारवाईत तहसीलदार बालाजी सोमवंशी, मंडलाधिकारी विजय खारतोडे, कोकरे, तलाठी प्रकाश कांबळे, अभिमन्यू जाधव, रमेश कदम, रविंद्र होले, कोतवाल माकर आणि अण्णा शिंगाडे हे या कारवाईत सहभागी झाले होते.

  • धडक कारवाई करण्याची गरज
    पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे दुर्लक्ष करीत कासुर्डी येथील गाव तलाव, भरतगाव, डाळींब, खोर, भांडगाव आदी ठिकाणी ओढे, नाले, तलाव, शेतजमीनी यामधून वाळू उपसा वाळूमाफीया करीत आहेत. हा सर्व प्रकार महसूल विभागाची परवानगी न घेता सुरू आहे. महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याच्या छुप्या पाठींब्यामुळेच खुलेआम वाळू उपसा सुरू असल्याचे बोलले जात आहे. महसूलच्या अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी धडक कारवाई करण्याची गरज आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)