तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन

चेन्नई – तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.करूणानिधी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री जयललिता आणि आता करूणानिधी यांच्या जाण्याने दोन्ही प्रमुख ध्रुव निखळल्याने त्या राज्याच्या राजकीय अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, करूणानिधी यांच्या निधनाबद्दल तामीळनाडू सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

प्रकृती खालावल्याने करूणानिधी यांना मागील अकरा दिवसांपासून येथील खासगी कावेरी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच सायंकाळी 6 वाजूून 10 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. करूणानिधी यांना दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाच्या आवारात त्यांच्या समर्थकांची आणि द्रमुकच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत होती. त्यांची प्रकृती आणखी खालावल्याचे वृत्त आज पसरल्यानंतर समर्थकांचे लोंढेच रूग्णालयाच्या आवारात जमा झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने दु:ख अनावर होऊन अनेकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. करूणानिधी यांच्यामागे दोन पत्नी आणि सहा मुलगे असा परिवार आहे. द्रमुकचे कार्याध्यक्ष एम.के.स्टॅलिन हे पुत्र आणि खासदार कनिमोळी या कन्या त्यांचे राजकीय वारसदार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तामीळनाडूच्या राजकारणातील करिष्माई नेतृत्वापैकी एक म्हणून करूणानिधी यांच्याकडे नेहमीच पाहिले गेले. त्यांच्या रूपाने द्रविड चळवळीतील एक भक्कम खांब निखळला. तब्बल सात दशके सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या करूणानिधी यांनी कलाकार आणि नेता म्हणून स्वत:चा ठसा उमटवला. कला आणि राजकीय क्षेत्रांत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कलैग्नार (कलाकार) आणि थलैवा (नेता) या उपाध्या मिळाल्या.

करूणानिधी यांचा राजकारणातील प्रवास थक्क करणारा ठरला. त्यांनी 1969 मध्ये स्वीकारलेले द्रमुकचे अध्यक्षपद अखेरच्या श्‍वासापर्यंत सांभाळले. तामीळनाडू विधानसभेवर ते 13 वेळा निवडून गेले. सर्वांत अखेरीस 92 व्या वर्षी ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी पाचवेळा तामीळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषवले. दिवंगत सी.एन.अण्णादुराई यांच्या निधनानंतर 1969 मध्ये ते सर्वप्रथम मुख्यमंत्री बनले. त्या राज्याची सत्ता प्रदीर्घ काळ जयललिता आणि करूणानिधी यांच्याभोवतीच फिरत राहिली.

आता त्या दोघांच्याही निधनाने तामीळनाडूतील जनतेला नवे नेतृत्व शोधावे लागणार आहे. दिल्लीच्या दरबारातही करूणानिधी यांनी स्वत:चे महत्व अबाधित ठेवले. त्यासाठी राष्ट्रीय राजकारणातील एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांशी प्रसंग पाहून हातमिळवणी करण्याची राजकीय चलाखीही त्यांनी दाखवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)