तामिळनाडूप्रकरणी राज्यपालांची वादग्रस्त भूमिका

 तमिळनाडूमध्ये चालू असणारे राजकारण…यामधील घटनांना असणारे विविध कंगोरे…या सर्व बाबींकडे वेगळ्या भूमिकेतून पाहण्याची आवश्‍यकता आहे. या सर्व घटनांमध्ये तमिळनाडूच्या राज्यपालांची भूमिका वादग्रस्त ठरणार असल्याचीही चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. त्यांचा या घटनांत कशापद्धतीने रोल आहे याविषयी…

तामिळनाडू राज्यामध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षामध्ये सुरू असलेली साठमारी केव्हा आणि कशी संपणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण चुरस, स्पर्धा आणि लढाई या नावानेही संबोधले जात आहे. अर्थात देशाच्या लोकशाहीवर आधारित राजकारणामध्ये सत्तेच्या खुर्चीचा वारस घराणे किंवा व्यक्तिगत प्रभाव अथवा शस्त्रसामर्थ्याच्या बळाऐवजी प्रत्येक सामान्य नागरिकाला प्राप्त झालेल्या मतदानाचा अधिकार म्हणजेच निवडणुकीच्या प्रक्रियेतून नियुक्त केला जात असतो. साहजिकच तेथे सत्तेची खुर्ची हस्तगत करण्यासाठी एकाऐवजी अनेक इच्छुकांमध्ये चुरस किंवा स्पर्धा निर्माण होणे अपरिहार्य ठरले. तामिळनाडू राज्यामधील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अशी चुरस म्हणजेच लढाई मात्र लोकशाहीच्या चौकटीमध्ये निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या संघटनात्मक पातळीमध्ये नेहमीप्रमाणे आढळणारी सर्वश्रुत स्वरुपाची नाही. ही लढाई एकाच बलवान पक्षाच्या संघटनेमधील शिस्त आणि निष्ठेशी संबंधित आहे. शिवाय हा पक्ष दीर्घकाळ एकाच नेत्याच्या अनिर्बंध नेतृत्वाखाली राज्याचा कारभार सांभाळत आहे. भाषावार प्रांतरचनेनंतर दक्षिणेतील मद्रास राज्य बहुसंख्य तमिळ भाषकांच्या तेथील वास्तव्यामुळे तमीळनाडू या नावाने ओळखले जाऊ लागले आणि तमिळ भाषा व संस्कृतीच्या आक्रमक अस्मितेने तेथे डोके वर काढल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळापासून सत्तारूढ असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या हातात असलेला त्या राज्याचा कारभार द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने काबीज केला. या पक्षाचे संस्थापक अण्णा दुरी राज्याचे मुख्यमंत्री बनले त्यांच्या निधनानंतर त्यांचे सहकारी एम. जी. रामचंद्रन यांनी बंडखोरी करून स्वतःचा पक्ष स्थापन केला. या पक्षाला त्यांनी अण्णा द्र.मु.क. असे नाव दिले. एम. जी. रामचंद्रन हे तमिळ चित्रपट सृष्टीतील अफाट लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या संघटनेची सूत्रे चित्रपटांमधील त्यांची नायिका जयललिता यांच्याकडे त्यांनी सोपविली. पुढे अचानक एम.जी.आर. यांचे निधन झाले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी जानकी यांना नियुक्त केले. परंतु, अवघ्या महिनाभरातच मुख्यमंत्रपदी जयललिता यांनी हस्तगत केले. चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता त्यावेळी त्यांचा सर्वात मोठा आधार ठरला.
जयललिता यांना त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकविण्यासाठी दीर्घकाळ सातत्याने अनेक अडचणी, संकटे, आरोप अडथळे आदींशी सामना करावा लागला. त्या पदावरील त्यांचा शेवटही मृत्यूने त्यांच्यावर घातलेला अनपेक्षित ठरला. या पार्श्‍वभूमिवर त्यांच्या एकनिष्ठ व्यक्तिगत सहकारी शशिकला यांची मुख्यमंत्रिपदाची वारस म्हणून सत्ताधारी अण्णा द्र.मु.क. पक्षानेच निवड केल्याचे ताबडतोब जाहीरही झाले. हंगामी मुख्यमंत्रिपदावर आरूढ झालेले पन्नीसेल्वम यांनी स्वतःच शशिकला यांच्या नावाला सर्वप्रथम मान्यता दर्शविली.
आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे शशिकला यांच्या नावाला प्रारभी पाठिंबा दर्शविणारे हंगामी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांची महत्त्वाकांक्षा दोनच दिवसभानंतर उफाळून आली. शशिकला यांच्या नेतृत्वाला आपण जो पाठिंबा दिला तो पक्षाने आपल्यावर दडपण आणल्यामुळे असे सांगण्यास त्यांनी आरंभ केला. या विशिष्ट हालचालींमुळे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम लांबणीवर पडला. दरम्यान महत्त्वाकांक्षी हंगामी मुख्यमंत्री आणि त्यांचे पाठिराखे जास्तच आक्रमक बनले. शशिकला यांच्या पाठिशी पक्षातील बहुसंख्य निष्ठावंत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला हंगामी मुख्यमंत्री यांच्या पाठिशी मूठभर बंडखोर लोकप्रतिनिधी असे चित्र एकमेकांसमोर अतिशय आक्रमकपणे उभे ठाकल्याचे वातावरण एव्हाना तामिळनाडूच्या राजकीय पटलावर गंभीर रूप धारण करून पाहण्यास मिळत आहे.
या सर्व घडामोडींमध्ये एकाच वेळी महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या राज्यपाल पदाचा कारभार सांभाळणारे विद्यासागर राव यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मूळचे ते भाजपचे सक्रिय ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते आहेत. केंद्र सरकारची सूत्रे त्या पक्षाच्या हातामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर तामिळनाडूच्या राज्यपालांनी राजीनामा दिल्यामुळे नव्या राज्यपालांची निवड होईपर्यंत त्यांच्या पदाची सूत्रे विद्यासागर राव सांभाळत आहेत. अशा परिस्थितीतच एकाच वेळी दोन राज्यांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे राज्यपाल तामिळनाडूच्या भावी मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा सोहळा ताबडतोब अंमलात आणण्यात “राजकीय’ उद्देशाने विलंब लावीत आहेत असा अतिशय गंभीर आरोप शशिकला यांचे पाठीराखेच नव्हे तर कॉंग्रेससह बहुतेक सर्वच विरोधी पक्ष आता करीत आहेत. सत्तारूढ पक्षाच्या संघटनेने अधिकृत ठराव संमत करून शशिकला यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्‍चित केल्यानंतरही राज्यपालांनी त्यांना शपथ घेण्याची ताबडतोब संधी दिली असल्याचे पाहून अण्णा द्र.मु.क. पक्षाला जास्तच उग्र बंडखोरीची झळ लागली आहे. नेमक्‍या याच नाजूक अवस्थेमुळे राज्यपालच नव्हे तर केंद्रातील भाजप सरकारही या प्रकरणी “पक्षपाती’ वर्तनाच्या गंभीर आरोपाचे धनी बनले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी तर रविवारी राज्यपालांकडून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री नियुक्तीप्रकरणी जो “आस्ते कदम’ पाऊल उचलले आहे ते योग्य नाही, त्यांनी संबंधित कर्तव्य ताबडतोब पार पाडणे अपेक्षित आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळेच त्यांना यामुळेही पक्षपाताच्या आरोपाला सामोरे जावे लागणार आहे. असेही निवृत्त न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट शब्दात निदर्शनास आणले आहे.

 

 एकनाथ बागूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)