तापमान वाढ वेळीच रोखा, नाहीतर गंभीर परिणाम

पर्यावरणतज्ज्ञ : संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातून धोक्‍याचा इशारा

पुणे – आगमी दहा वर्षे ही हवामान बदलाबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. या काळात तापमान वाढ रोखण्यासाठी ठोस उपाय केले नाही, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघाच्या “इंटर गव्हर्मेट पॅनेल ऑफ क्‍लायमेट चेंज’च्या अहवालाद्वारे देण्यात आला आहे. ही तापमान वाढ रोखायची असेल, तर बांधकाम क्षेत्र आणि वाहन उत्पादन क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

-Ads-

जगभरात हवामान बदल अणि तापमान वाढीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा जागतिक संघटनेने दिला आहे. भारतातही हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत असतानाही यासंदर्भात कोणतेही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. पुण्यातील पर्यावरण कार्यकर्ते अनुपम सराफ यांनी पत्राद्वारे महापालिका, राज्यसरकार आणि केंद्र सरकार या सर्वांचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अजूनही पर्यावरण संवर्धनाकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर पर्यावरणाला हानी पोहचविणारे विविध विकास प्रकल्प मोठ्या जोमाने राबविले जात आहेत.

याबाबत सराफ म्हणाले, “सरकार फक्‍त जीडीपी वाढविण्यावर भर देत आहे. मात्र, पर्यावरण या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी काय केले पाहिजे, याबाबत अजून कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत. असे असताना पॅरिस परिषदेत देण्यात आलेल्या वचनांची पूर्तता आपण कसे करणार? पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने प्रत्येक स्तरावर सल्लागार समिती स्थापन करून तिच्या सूचनेनुसार काम केले पाहिजे.’

हरित आच्छादन राखणे आवश्‍यक :
जे प्रकल्प सध्या कार्यरत आहे, त्यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्याने कोट्यवधी झाडे लावली, तरी दहा वर्षांत पाहिजे तितक्‍या प्रमाणात तितके कार्बन ऍब्झॉर्बेशन होणार नाही. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या झाडांचे रक्षण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वृक्षतोड हा गंभीर गुन्हा जाहीर केला पाहिजे. तसेच “ट्री अॅक्‍ट’ तरतुदी काटेकोर राबविणे आवश्‍यक असल्याचे अनुपम सराफ यांनी सांगितले आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)