पिंपरी – ताथवडे, पुनवळे गावच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावरील अंडरपासची उंची वाढवण्याबाबत ठोस कार्यवाही करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (दि. 16) ताथवडे व पुनवळे गावांना भेट दिली. ग्रामदैवत श्री नृसिंह मंदिरात ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी परिसरातील विविध विकास कामांचा आढावा सुळे यांनी घेतला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संदीप पवार, नगरसेवक मयूर कलाटे, माजी नगरसेविका यमुना पवार, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुप्रिया पवार यांच्यासह ताथवडे-पुनवळेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संदीप पवार म्हणाले की, पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे आणि पुनवळेतील अंडरपासची उंची कमी झाल्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचते. त्यामुळे या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विकाभागने वाकड-हिंजवडी परिसरात चक्राकार वाहतूक व्यवस्था केली. त्याचा चांगला परिणाम होत आहे. त्याला जोडून ताथवडे आणि पुनवळेतील अंडरपासची उंची वाढवण्यात यावी. यामार्गाने वाहतूक झाल्यास आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ताथवडेतील अंडरपासची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामस्थांनी यावेळी नकाशाद्वारे समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. त्यावर लवकरच पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते आणि राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेण्यात येईल. परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही यावेळी सुळे यांनी दिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा