तातडीच्या पदभरतीचा मार्ग मोकळा

अग्निशमन दल, आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्‍टरांची होणार भरती


नगरविकास विभागाची पदभरातीला मंजुरी


अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव अर्थ विभागाकडे

पुणे – महापालिकेच्या आरोग्य आणि अग्निशमनदलाच्या कामासाठी आवश्‍यक असलेल्या तातडीच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी सकारत्मक अभिप्राय दिला असून हा प्रस्ताव अर्थ विभागाच्या मान्यतेसाठी गेला असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. सुमारे 100 हुन अधिक पदांची ही भरती आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्‍टरांची अनेक पदे रिकामी आहेत. त्यामुळे महापालिकेकडून शहरात लाखो रुपये खर्चून मोठी हॉस्पीटल उभारण्यात आली असतानाही केवळ कर्मचारी नसल्याने या रुग्णालयांचे खासगीकरण करण्याची वेळ आली आहे. तशीच स्थिती पालिकेच्या अग्निशमन दलाची आहे. या विभागासाठी सुमारे 900 पदे मंजूर असून प्रत्यक्षात केवळ 450 कर्मचारी कार्यरत आहेत. तर, पालिकेने शहरात नवीन 4 अग्निशमन केंद्र उभारलेली असून केवळ कर्मचारी नसल्याने ही केंद्र बंद ठेवण्याची वेळ पालिकेवर आली आहेत. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही विभागांच्या सुमारे 120 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्याच्या नगरविकास विभागास पाठविला होता. मात्र, शासनाकडून त्याबाबत काहीच हालचाली नव्हत्या. मात्र, महापालिका आयुक्त राव यांनी राज्य शासनाकडे प्रलंबित विषयाबाबत झालेल्या बैठकांमध्ये ही पदभरती गरजेची असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर नगरविकास विभागाने या पदभरातीला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे गेला असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामकाज होणार सुरळीत?
नगरविकास विभागाने या प्रस्तावावर सकारात्मक मान्यता देतानाच, महापालिका ही आर्थिक स्वायत्त संस्था आहे. या पदभरतीनंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा कोणताही भार राज्य शासनावर येणार नाही, असा अभिप्राय अर्थ विभागास कळविला आहे. त्यामुळे अर्थ विभागात या प्रस्तावास कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे पुढील काही महिन्यांत या रिक्त जागा भरून या दोन्ही विभागांचे कामकाज अधिक सुरळीत तसेच प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)