तांबे यांचे “पितळ’ उघडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांचे पाणी पुरवठ्याबाबतचे स्वयंनिर्णय आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकामांना पाणी पुरवठा करण्यासाठी “एनओसी’ देणे थांबविणे आणि पुन्हा नव्याने सुरु करण्याच्या उद्योगाने त्यांच्याकडे काही तासांपूर्वीच सोपविलेला सहशहर अभियंते पदाचा अतिरिक्त पदभार आयुक्त हर्डीकर यांनी तडकाफडकी काढून घेतला आहे. त्यांचे हे निर्णय तपासून घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हरात पाण्याची टंचाई असल्याचे कारण देत, स्थायी समितीने तीन महिन्यांपूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नव्या बांधकामांना पाणी पुरवठा न करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावर आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. दरम्यानच्या काळात रामदास तांबे यांनी या प्रस्तावाची स्वत:च्या अधिकारात अंमलबजावणी देखील सुरुवात केली. मात्र, या कालावधीत त्यांनी याच परिसरातील दहा गृहप्रकल्पांना “एनओसी’ दिल्याची बाब राहुल कलाटे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ही “पाणीबाणी’ मागे घेतली. नेमकी कोणत्या कारणांमुळे ही “पाणीबाणी’ लागू केली आणि पुन्हा मागे घेतली, याबाबत वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करुनदेखील तांबे यांनी याची माहिती “गोपनीय’ या सदरात मोडत असल्याचे कारण देत, ही माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कलाटे यानी तांबे यांच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. आयुक्त हर्डीकर येत नाहीत, तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याचा पावित्रा घेतला.

दरम्यान, पाणी पुरवठ्याला “एनओसी’ न देणे आणि पुन्हा सुरु करण्यामुळे झालेली गोंधळाची स्थिती, शिवसेना गटनेत्यांकडून तांबेंबरोबरच आयुक्त हर्डीकर यांच्यावर “बिल्डर लॉबी’शी हात मिळवणी करुन, हात ओले केल्याचा आरोप केला. याची गंभीर दखल आयुक्त हर्डीकर यांनी घेतली. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच तांबे यांना सह शहर अभियंतापदी पदोन्नती देत, त्यांच्याकडे पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार सोपविला होता. तांबे यांच्याबरोबरच आयुक्तांवर देखील आरोप झाल्यानंतर तांबें यांच्याकडील सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. तांबे यांनी स्वत:च्या अधिकारांचा वापर करुन ही पाणीबाणी जाहिर केली होती. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त हर्डीकर यांना ही बाब कळविली नाही. त्यामुळे सहशहर अभियंता मकरंद निकम यांना या सर्व प्रकाराची शहानिशा करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतर तांबे यांच्या कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे.

गटनेत्यांनी पुरावे द्यावेत!
“पाणीबाणी’ लागू करणे व पुन्हा शिथील करण्याच्या कारणामुळे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप केला होता. याबाबत आयुक्त हर्डीकर यांना विचारले असता अशा आर्थिक देवाण-घेवाणीचे कोणतेही पुरावे कलाटे यांच्याकडे असल्यास ते सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)