तहानलेले नगरकर विरोधकांना पाणी पाजणार- रावसाहेब दानवे

प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन ; मनपा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ 

नगर: मुळा धरण उशाला असूनही नगरकरांना तहानलेले ठेवणाऱ्या विरोधकांना ही तहानलेली जनता 9 डिसेंबरला पाणी पाजणार आहे. भाजपला एकहाती सत्ता द्या, नगरच्या सर्वांगिण व सुनियोजित विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी देऊ, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केली.

भाजच्या महापालिका निवडणूक प्रचार शुभारंभ रविवारी खा. दानवे यांच्या उपस्थित झाला. त्यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात रात्री झालेल्या जाहिर सभेत ते बोलत होत. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंग ठाकूर, प्रदेश संघटक विजय पुराणिक, खासदार दिलीप गांधी, ऍड. अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, गटनेते सुवेंद्र गांधी, लक्ष्मण साळवी, शिवाजी शेलार, राहुल चव्हाण, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.

दानवे म्हणाले, नगर शहरात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. 15 वर्षात सत्ता भोगणारे नागरिकांना या मुलभूत सुविधा देऊ शकले नाहीत. एकेकाळी नगर शहर हे राज्यात नावाजले जात असे. सध्या त्याला कुणाची नजर लागली? शांत शहर अशांत कुणी केले? त्यांना येत्या निवडणुकीत उखडून फेका असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, माझ्या हाताला यश आहे. मी जेथे जेथे प्रचाराचा नारळ फोडतो, तेथे भाजपची सत्ता येते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे नगरलाही भाजपची सत्ता येईल, याबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नाही. निकालानंतर महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना नगरमध्ये आमंत्रित करून शहरासाठी तीनशे कोटींचा घसघशीत निधी मंजूर करायला लावू, असे आश्‍वासन खा.दानवे यांनी दिले.

ना.शिंदे म्हणाले, भाजपने 68 उमेदवार दिले. विरोधकांना तेही देता आले नाहीत. छाननीत जरी चौघांचे अर्ज बाद झाले असले, तरी न्यायदेवतेवर आमचा विश्‍वास आहे. आम्हाला न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयातही न्याय मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या 15 वर्षांत सत्ता भोगणाऱ्यांनी काय दिवे लावले? असा सवालही त्यांनी केला. यावेळी खा. गांधी यांचे भाषण झाले. ऍड. आगरकर यांनी प्रास्ताविक केले. खा. दानवे यांच्या हस्ते रविवारी विशाल गणपती मंदिरात महाआरती करुन करण्यात आला. यावेळी भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन करत मोटारसायकल रॅली काढली. बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. भिस्तबाग चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

राष्ट्रवादीने डावलेले वाखुरे भाजपत

उमेदवारी देवूनही पुन्हा दबावाचा वापर करून विनय वाखुरे यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे नाराज वाखुरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)