तहसीलदारांची वाळूतस्करासह “हवाईसफर’!

तिरुपती देवदर्शन; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

श्रीगोंदे – श्रीगोंद्यातील वाळूतस्करी नेहमीच चर्चेत असते. वाळूतस्करी विरोधात कितीही कारवाया झाल्या, तरी महसूल विभागाला वाळूतस्करी रोखण्यात अपयश आलेले आहे. त्यातच श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी चक्क वाळूतस्करासह “हवाईसफर’ करून तिरुपती दर्शन केल्याची एकच चर्चा सर्व वाळू ठेकेदारांमध्ये रंगली आहे. विशेष म्हणजे या “हवाईसफरी’चे फोटोदेखील “सोशल मीडिया’वर पाहायला मिळत आहेत. तहसीलदारांनी वाळूतस्करासह केलेल्या “हवाईसफरी’मुळे माळी यांच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
तालुक्‍यातील घोड, भीमा, हंगा या नद्यांसह गावोगावच्या ओढ्या नाल्यातून सर्रास वाळूतस्करी होत आहे. महसूल प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असते. अनेक गावांतून वाळूतस्करी करणाऱ्यांविरोधात महसूलकडे तक्रारी करूनदेखील कारवाई होत नसल्याचा आरोप अनेकांनी जाहीरपणे केला आहे. महसूलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वाळूतस्करांशी असलेले “अर्थ’पूर्ण संबंधदेखील सामान्यांपासून लपून राहिलेले नाहीत. वाळूतस्करांना तहसीलदारांचाच आशीर्वाद असल्याचा आरोप नुकताच शिवसेना नेते घनश्‍याम शेलार यांनी जाहीरपणे वाळूतस्करी विरोधातील आंदोलनात केला होता.
तालुक्‍यात सर्वत्र जेसेबी, पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने बेसुमार वाळूतस्करी राजरोसपणे सुरू आहे. काही वेळा महसूलकडून कारवाई केली जाते; मात्र “बड्या’ वाळूतस्करांना नेहमीच अभय मिळते.
तालुक्‍यात वाळूतस्करांनी थैमान घातले असल्याने तहसीलदारांच्या भूमिकेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यातच तहसीलदारांनी गेल्या पंधरवड्यात वाळूतस्करासह “हवाईसफर’ केल्याने त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. तालुक्‍यातील सांगवी दुमाला येथील वाळूतस्कराच्या शेजारील “सीट’वर तहसीलदार विमानात बसल्याचे फोटो “सोशल मीडिया’वर व्हायरल झाले आहेत. तहसीलदार माळी, तो वाळूतस्कर व अन्य एक व्यक्‍ती असे तिघे मागील पंधरवड्यात “तिरुपती’चे दर्शन करून आल्याचे समजते. महसूलचे जबाबदार अधिकारी जर वाळूतस्करासह “हवाईसफर’ करीत असतील, तर वाळूतस्करांच्या विरोधात कठोर कशी होईल, असा सवाल उपस्थित होत आहे. अवैध वाळूतस्करीमुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. तालुक्‍यातील वाळूतस्करी बेसुमार वाढली चालली असताना महसूल प्रशासनाचे प्रमुख असणाऱ्या तहसीलदार माळी यांनी वाळूतस्करासह परराज्यात जाऊन केलेल्या देवदर्शनामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

चौकशीची मागणी
तहसीलदार महेंद्र माळी यांचे वाळू, मुरूम आणि मातीची तस्करी करणाऱ्या सर्वांबरोबर “अर्थ’पूर्ण संबंध आहेत. त्यांनी वाळूतस्करासह केलेल्या “हवाईसफरी’ची चौकशी करावी तसेच तहसीलदार माळी यांच्या कॉल रेकॉर्डिंगची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक चौधरी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)