तळेगाव नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा वादळी

अनेक मुद्‌द्‌यांचा पोलखोल : सुनील शेळके, किशोर भेगडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले

तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेची शनिवारी (दि. 2) झालेली सर्वसाधारण सभा तळेगाव शहर सुधारणा आणि विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे आणि सत्तारूढ भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक सुनील शेळके यांनी आक्रमक भूमिका घेतली. नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचे धिंडवडे काढत सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

नगरपरिषदेतील विरोधी पक्षासह सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या विविध खात्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. नगरसदस्यांनी केलेल्या आरोपांचे खंडण करताना अधिकारी हतबल झाल्याचे पहावयास मिळाले. सुनील शेळके आणि किशोर भेगडे यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या फैरीने शनिवारची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. सभागृहात पटलावरील विषयांवर चर्चा आणि वाचन न होता ते मंजूर करण्याचे अधिकार नगराध्यक्षांना नसल्याचे आणि अधिकाराचा दुरुपयोग नगराध्यक्षा चित्रा जगनाडे करीत असल्याचा गंभीर आरोप किशोर भेगडे यांनी केला.

कार्यवृत्तांतातील खाडाखोडीवर नगरसदस्य किशोर भेगडे, सुनील शेळके, अरुण माने, वैशाली दाभाडे यांनी आक्षेप घेत प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली. जाणून बुजून काही नगरसेवक सभेत गोंधळ घालतात असल्याचे प्रत्युत्तरादाखल नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी स्पष्ट केले.

लोखंडी जाळ्या काढण्याची निविदा रद्द
उद्यान विभागाने शहरात लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळीचा खर्च एक हजार रुपये, तर लोखंडी जाळी हटविण्याचा खर्च प्रति जाळी 450 रुपये म्हणजे ही लूटच आहे, असा गौप्यस्फोट शेळके यांनी केला. सुनील शेळके यांच्या या विषयाला पाठिंबा देत नगरसेवक अमोल शेटे हे आक्रमक झाले. शेळके आणि शेटे यांनी उद्यान विभागाच्या कारभारावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे लोखंडी जाळ्या काढण्याची निविदा रद्द करण्याची मागणी सुनील शेळके यांनी लावून धरल्याने सभागृहाने त्यास मान्यता दिली.

नगरपरिषद प्रशासनाने चांगल्या स्थितीतील काही विद्युत पंप भंगाराच्या भावात विकल्याचा मुद्दा आणि तळेगाव परिसरात गेल्या काही काळात झालेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्यास केवळ नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत सुनील शेळके नगरपरिषदेवर प्रशासनावर निशाणा साधला. विद्युत पंप भंगाराच्या भावात विकले, यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाला असून, त्यामध्ये चौकशी करण्याची सूचना शेळके यांनी केल्या. या चर्चेमध्ये नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसदस्य किशोर भेगडे, सुनील शेळके, कल्पना भोपळे, शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, अमोल शेटे, कल्पना भोपळे, अरुण माने, अरुण भेगडे, सुनील कारंडे आदींनी सहभाग घेतला.

तळेगावच्या हद्दीबाहेरील नळजोडावर व्यापारी कर
नगरपरिषद हद्दीबाहेर देण्यात आलेल्या नळजोडावर मीटर पद्धतीने व्यापारी कर लावावा, तसेच शहरातील होर्डिंग आणि फ्लेक्‍सवर कर वसूल करावा, असा ठराव दोन वर्षांपूर्वी करण्यात येऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नगरपरिषदेचे करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे सुनील शेळके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत मुख्याधिकारी वैभव आवारे यांना जबाबदार धरण्यात यावे, असे मतही त्यांनी नोंदविले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)