तळेगाव ढमढेरेत 2 हजार पोलिसांचे पथसंचालन

– गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्त : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी
तळेगाव ढमढेरे – शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळेगाव ढमढेरे येथे गणेशोत्सव आणि बकरी ईद या दोन्ही सणादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 2 हजार पोलिसांचे संचलन करण्यात आले. अतिसंवेदनशील गावातील गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या भांडणांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त कडक केल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 116 गणेश मंडळ आहेत. या सर्व मंडळावर लक्ष आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी पोलीस दंगल नियत्रण पथक, पुणे ग्रामीण पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने सुमारे 2 हजार पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले आहे. या काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. गणपती विसर्जनावेळी गटामध्ये वादविवाद होऊ नये, यासाठी पोलीस विभागाच्या वतीने पोलीस पथसंचालन करण्यात आले. तळेगाव ढमढेरे येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून येथील नागरिक अचंबित झाले.
यावेळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, शिक्रापूर पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, दंगल नियंत्रण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी-कर्मचारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उप पोलीस निरीक्षक प्रशांत माने, सहाय्यक उपपोलीस निरीक्षक प्रकाश जगदाळे, शशिकांत बंड, संदीप जगदाळे, अनिल जगताप, उमेश जगताप आदी पोलीस उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)