तळेगावात जिवंत देखाव्यांतून प्रबोधनाकडे मंडळांचा कल

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव-दाभाडेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिवंत व हलत्या देखाव्यांवर भर दिला. प्रबोधनात्मक देखाव्यांकडे मंडळांचा कल असल्याचे पाहावयास मिळते. शहरातील मानाचा पहिला गणपती श्री डोळसनाथ तालीम मंडळाची रिद्धी-सिद्धी समवेत असलेली भव्य मूर्ती आकर्षक आहे. मंडळाची स्थापना 1903 ला झाली. यावर्षी मंडळाने “स्वराज्याच्या आणा-भाका’ हा 25 कलाकारांच्या सहाय्याने समाज प्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे.

मानाचा दुसरा गणपती कालिका मंडळाचा आहे. अध्यक्ष माजी नगराध्यक्षा राजेंद्र जांभुळकर आहेत. मंडळ 114 वे वर्ष साजरे करत आहे. दिल्ली येथील अक्षरधाम मंदिराचा देखावा मंडळाने सादर केला आहे. तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मानाचा तिसरा गणपती आहे. अध्यक्ष गौरव क्षीरसागर आहेत. आकर्षक मखरीत गणेश विराजमान असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मानाचा चौथा गणपती आहे. सागर जाधव अध्यक्ष आहेत. मंडळाने फुलांची सजावट केली आहे. मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ आहे. शैलेश धर्माधिकारी अध्यक्ष आहेत. मंडळाचे स्वतःचे ढोल-ताशा पथक आहे. मंडळ वर्षभर विविध उपक्रम राबवते.

राजेंद्र चौकातील जय बजरंग तरूण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दीपक जव्हेरी आहेत. मंडळ वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवते. तळेगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. मखरातील सुबक मूर्तीला आकर्षक रोषणाई केली आहे. चावडी चौक तरूण मंडळाची स्थापना 1974 मध्ये झाली असून मंडळाचे अध्यक्ष राहुल बोत्रे-पाटील आहेत. मंडळाने विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. फुले व आकर्षक सजावट केली आहे.

डोळसनाथ कॉलनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संकेत कुल असून यावर्षी मंडळाने जयपूर पॅलेसची (सूर्यमहाल) प्रतिकृती उभारली आहे. खळदे आळीतील मुरलीधर मंडळाने पौराणिक देखावे सादर करण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली असून “भगवान श्रीकृष्णाकडून अरिष्टासुराचा वध’ हा 10 मूर्तींच्या सहाय्याने हलता देखावा सादर केला आहे.
भेगडे तालीम मंडळाचा मानाचा शेवटचा गणपती आहे. निखील गाडे मंडळाचे अध्यक्ष असून मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवते.

घोरावाडी स्टेशन येथील तरूण ऐक्‍य मित्र मंडळाचे अध्यक्ष जीवन भेगडे आहेत. गणपतीची मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली आहे. नगरसेवक संतोष भेगडे व शिक्षण मंडळाचे माजी सदस्य शंकर भेगडे मंडळाचे आधारस्तंभ आहेत.
भेगडे आळी येथील श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विनायक भेगडे आहेत. “स्वदेशी वस्तू वापरा-देश वाचवा’ हा संदेश देणारा जिवंत देखावा सादर करून जनजागृती केली आहे.

मंडळाने जिवंत देखाव्याची परंपरा यावर्षीही राखली आहे. “नीतिमूल्यांचा ऱ्हास’ हा समाजप्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे. प्रतीक भेगडे-पाटील अध्यक्ष आहेत. मंडळ गोकुळाष्टमी उत्सव साजरा करते. येथील कानिफनाथ महाराजांचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. ढोरवाडा येथील जय बजरंग मित्र मंडळाने ‘बाणासुराचा वध’ हा सहा मूर्तींच्या सहाय्याने हलता देखावा सादर केला आहे. सचिन खरटमल अध्यक्ष आहेत.

जिजामाता चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाश दाभाडे असून साईदर्शन हा देखावा सादर केला आहे. सुभाष चौकातील अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव असून मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली आहे. विशाल मित्र मंडळाचे अध्यक्ष कुणाल पवार असून औंढा नागनाथ मंदिर उभारले आहे. दोन मूर्तींच्या सहाय्याने हलता देखावा सादर केला आहे. फ्रेड्‌स क्‍लबचे अध्यक्ष अजय परदेशी असून दुर्गा मातेचे कालिका रूप अर्थात “अंधकासुराचा वध’ हा चार मूर्तींच्या सहाय्याने हलता देखावा सादर केला आहे.

शेतकरी तरूण मंडळाची स्थापना 1903 ची असून रोहन भेगडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाने रक्‍तदान शिबीर उपक्रम राबवला आहे. राजा शिव छत्रपती मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहन शिंदे असून विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. शिवप्रेमी मित्र मंडळाची स्थापना 1966 मध्ये झाली असून अध्यक्ष धीरज टेकवडे आहेत. “मतदार राजा जागा हो तू लोकशाहीचा धागा आहेस’ हा समाज प्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे.

बनेश्‍वर मित्र मंडळाचे अध्यक्ष संग्राम कोपनर असून “चला हवा येऊ द्या’ च्या धर्तीवर चला हसू येऊ द्या हा समाज प्रबोधनपर जिवंत देखावा सादर केला आहे. चेतन शेलार व संदीप भोसले यांच्या अप्रतिम अभिनयाने लक्ष वेधून घेतले आहे. दाभाडे आळी येथील जय भवानी तरूण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत काळोखे असून मंडळाने 16 कलाकारांच्या सहाय्याने शंभू तुळजेच्या भूमीवरती पात्र असे स्त्री आदराला, शिवपिंडिवरील बिल्व दलाचे मोल नारीच्या पदराला’ हा समाज प्रबोधन देखावा सादर केला आहे.

सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश दाभाडे असून बिघडलेली तरुणाई हा 35 कलाकार असलेला जिवंत देखावा सादर केला आहे. देखाव्यातून समाज प्रबोधन करण्यात आले आहे. सवाई वाड्यातील विक्रांत मंडळाने पुणे येथील भाऊ रंगारी मंडळाची गणपतीची प्रतिकृती साकारली आहे. आझाद मित्र मंडळाने गणेश जन्म हा हलता देखावा सादर केला आहे. साने आळी येथील हिंदूराज तरूण मंडळाचे अध्यक्ष विनायक होणावळे असून 15 कलाकारांच्या सहाय्याने “वेडात मराठे वीर दौडले सात’ हा जिवंत देखावा सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)