तळीरामांनो सावधान; पोलिसांच्या मदतीला महापालिका

नववर्षाची तयारी : 25 “ब्रेथ अॅनलायझर’ पोलिसांना सुपूर्द

पुणे – नवीन वर्ष स्वागताच्या नावाखाली मद्यसेवन करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर यंदा मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. यासाठी महापालिका शहर पोलिसांना तब्बल 100 “ब्रेथ अॅनलायझर’ देणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 25 “ब्रेथ अॅनलायझर’ महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांच्याकडे बुधवारी सुपूर्द करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे यावेळी उपस्थित होते. वर्षा अखेरीस मोठ्या प्रमाणात न्यू इअर पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे मद्यपी वाहन चालकांची संख्या लक्षणीय असते. त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. यासाठी पोलिसांकडे 50 मशीन असून त्यातील 14 बंद, तर 34 कार्यरत आहेत. त्यामुळे यंदा या मशीनची संख्या 25 ने वाढल्याने पोलीस 22 विभागाअंतर्गत सुमारे 60 ठिकाणी कारवाई करू शकणार आहेत. त्यात प्रामुख्याने शहरात प्रवेश करता येणारे रस्ते, तसेच मोठ्या प्रमाणात पार्ट्या केल्या जातात, अशा ठिकाणांचा या मोहिमेत समावेश असल्याची माहिती उपायुक्त सातपुते यांनी दिली. तसेच या मशीन अत्याधुनिक स्वरूपाच्या असून त्यात सीसीटीव्हीसह, जीपीएस यंत्रणा आणि तपासणीनंतर रिसीटची सुविधाही असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेची जय्यत तयारी 
शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांमध्ये नियमित बैठका सुरू आहेत. या बैठकांच्या अनुषंगाने, वाहतूक पोलिसांनी 100 मशीनची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनीच “स्पेसिफिकेशन’ निश्‍चित करून दिलेले होते. त्यातील पहिल्या टप्प्यात 25 मशीन आलेल्या असून त्या तातडीने देण्यात आल्या आहेत. याशिवाय, वाहतूक सुरळीत करण्यासाठी 1 हजार लोखंडी संरक्षक कठडे, 200 प्लॅस्टिक कोन, 200 प्लॅस्टिक डिव्हायडर, 1 हजार बॅटन, 1500 फ्लोरेसेंट जॅकेटही महापालिका देणार असल्याची माहिती महापौर टिळक यांनी दिली. त्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात सुमारे साडेचार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून ही साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आठवडाभरात 1,150 जणांवर कारवाई
सलग सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ची कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत गेल्या आठवडाभरात सुमारे 1,150 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी दिली. तर मागील संपूर्ण वर्षात सुमारे 15 हजार जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात एकट्या 31 डिसेंबर 2017 रोजी सुमारे 1,200 जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, यंदा आठवडाभरात 1,150 जण सापडल्याने तसेच आता मशीनची संख्याही वाढल्याने हा आकडा लक्षणीय वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणीही “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ करू नये. मद्य घेऊन वाहन चालविल्याने अपघात घडून निष्पापांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ही कारवाई अधिक सक्षम होण्यासाठी या मशीन पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
– मुक्ता टिळक, महापौर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)