तळीरामांच्या मैफिलीचा सर्वसामान्यांना त्रास

चिखली – पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांचा वचक न राहिल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. चिखली येथील नवीनच झालेल्या पोलीस स्टेशन पासून काही हाकेच्या अंतरावर बियर शॉपी आहेत. त्यांना बियर विकण्याचा परवाना आहे. परंतु अनेकांनी शॉपच्या आतमध्येच मद्यप्राशन करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बियर शॉपीला बिअर बारचे स्वरूप आले असून त्याचा परिसरातील सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

संभाजीनगर, मोरेवस्ती, सानेचौक याही ठिकाणी चौकीच्या हद्दीत बियर शॉपी आहेत. या शॉपीमध्येही बियरसह विनापरवाना मद्यपानासाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे. हा कायद्याने गुन्हा असतानाही कारवाई होत नाही. परिणामी, खुलेआम बियर शॉपीच्या बाहेर तळीराम बियर पित बसतात. अक्षरश: रस्त्यावर मद्यपींची गर्दी होते. याठिकाणी मद्यपींची होणारे वाद नित्याचेच झाले आहे. महिला वर्गाचा येथील वावर असुरक्षित झाला आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. येथील रहिवाशांना, परिसरातील नागरिकांना तरुणी, महिलांना या मद्यपींना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही बियर शॉपी मालकांनी तर पिणाऱ्यांसाठी बसण्याच्या सोयीपासून, पंखे व खोल्यांचीही व्यवस्था केली आहे. बिनधास्त व सहज दारू पिता येत असल्याने या शॉपींकडे मोठ्या संख्येत तरुण वर्ग वळत आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, हे पाहता पोलीस प्रशासन आणि दारुबंदी विभागाने खुलेआम दारू पिण्याचा परवाना दिला आहे का, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

दरम्यान, चिरी-मिरीसाठी पोलिसांनी मोहिमा उघडल्या असून टपऱ्या, बियरशॉपी याठिकाणी हमखास तरुणाई दिसून येत असल्याने त्याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यावर झाला आहे. त्यातूनच गुंडगिरी फोफावली आहे. शहरात राजरोसपणे सुरु असलेले अवैध धंदे सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र निर्ढावले आहे. शहरात काही अवैध व्यवसाय शहरातील पोलीस ठाण्यांच्या परिसरात सुरू आहेत. सद्य परिस्थितीत अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. तरीही पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. सर्वसामान्याचे संरक्षण आणि कायदा सुव्यवस्था यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय सुरू झाले. परंतु, पोलिसांची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच असल्याने अवैध धंदे करण्यांचे फावले आहे. ज्या भागात असे प्रकार सुरू आहेत. तेथील पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)