तळहीरा तलावाची पाणीपातळी खालावली

वाठार स्टेशनला भीषण टंचाई : ग्रामस्थांची टॅंकरची मागणी

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन व परिसरातील जनतेची तहान भागवणाऱ्या तळहिरा तलावाची पाणीपातळी दिवाळी अगोदरच खालावू लागली असून भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाने याची तातडीने दखल घेवून टॅंकर सुरू करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाठार स्टेशन ही कोरेगाव तालुक्‍यातील मोठी आणि प्रमुख बाजारपेठ मानली जाते. येथील लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5393 होती. परंतु, आज रोजी जनगणना केल्यास 2011 च्या जनगणनेपेक्षा दुप्पट होईल. वाठार स्टेशन हे गाव अस्थिर लोकसंख्येचे असल्यामुळे वाठार स्टेशनला पिण्याच्या पाण्याची टंचाई सतत भासते. त्याचप्रमाणे वाठार स्टेशन हे कोरेगाव तालुक्‍यातील तसेच सातारा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असल्यामुळे येथे पंचक्रोशीतील नागरिकांची सतत ये-जा असते.

गेल्या वर्षी सुद्धा शासनामार्फत टॅंकर सुरू होते. परंतु, पावसाळा सुरू झाल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी वाठार स्टेशनच्या पाणीपुरवठा विहिरींची पाण्याची पातळी बघून शासकीय टॅंकर बंद केले. गतवर्षीसुद्धा पावसाळा कमी झाल्याने वाठार स्टेशनच्या परिसरातील सर्व विहिरी, ओढ़े, तळ हिरा तलाव, शासकीय पाणीपुरवठा विहिरींची पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे कोरड्या पडल्या आहेत. वाठार स्टेशनला पाणीपुरवठा करणारी विहीर तळहीरा तलावाच्या खालच्या बाजूस आहे.

तलावाची पाणीपातळी खालावल्याने ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडली आहे. स्थानिक प्रशासनाने तलावाच्या खालच्या बाजूस झरा काढला असून त्यातून सायफन पद्धतीने पाणी विहिरीत सोडले आहे. त्याद्वारे वाठार स्टेशनला महिन्यात एक वेळा पाणी येते. पाण्याची टंचाईमुळे लोकांना खाजगी टॅंकरचा आधार घ्यावा लागतो. तरी जिल्हा प्रशासनाने वाठार स्टेशनच्या ग्रामस्थांची पाणीटंचाईची ससेहोलट थांबवावी व त्वरित शासकीय टॅंकरची सोय करावी, अशी मागणी वाठार स्टेशनच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)