तळवडेला वाहतूक कोंडीने ग्रासले

निगडी – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यात पोलिसांना यश आले असले तरी तळवडे आयटी पार्क परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न अद्याप “जैसे थे’ आहे. चाकण परिसरातून येणारी जड वाहने व तळवडे आयटी पार्कमधील असंख्य बेशिस्त वाहनांमुळे नागरिकांची व आयटी कर्मचाऱ्यांना ये-जा करणे डोकेदुखी ठरत आहे.

चाकणकडून येणारा एक रस्ता तळवडे आयटी पार्क परिसरातून येतो. पुणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीचा ओघ कायम असतो. त्यामुळे ट्रक, कंटेनरबरोबरच तळवडे आयटी पार्कमधील असंख्य बस व अन्य वाहने लवकर पोहचण्यासाठी तळवडे रस्त्यावरून बेशिस्तपणे येजा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे.
प्रामुख्याने सकाळी आणि सायंकाळी येथे आयटी पार्कच्या वाहनांमुळे लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे छोट्या मोठ्या वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे असंख्य दुचाकीस्वार वाहतूक कोंडीमुळे अडकून पडतात. वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी अनेकजण चुकीच्या दिशेचा वापर करीत वाहने दामटतात. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होतात.

आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी दुचाकीस्वार बिनदिक्‍कतपणे पदपथाचा वापर करत असतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, पोलिसांना कठीण जात आहे. तळवडे आयटी पार्कवरून येताना या रस्त्यावरील सोनावणे चौक, गणेशनगर, तळवडे गावठाण चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. ही वाहतूक कोंडी तळवडे भागापासुन तर निगडी सिग्नलपर्यंत सकाळ संध्याकाळ जाणवते. गर्दीच्या वेळी वाहतूक पोलीस या ठिकाणची वाहतूक नियंत्रित करतात. मात्र, अनेकजण लवकर जाण्यासाठी विरुद्ध दिशेने येतात. या ठिकाणी काही भागातला रस्ता अरुंद आहे, तर काही ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे, याचा परिणाम इथल्या वाहतुकीवर होत आहे.

आयटी पार्क व चाकण एमआयडीसीमुळे सकाळ व संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी असते, यासाठी वाहतूक विभागाने दखल घेण्याची आवश्‍यकता आहे. वयोवृद्ध नागरिकांना व आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेताना प्रचंड त्रास होतो. वाहतूक कोंडीबरोबर हॉर्नचा कर्कश आवाजामुळे आम्ही त्रासलो आहोत.
– सोमाजी बोडके, स्थानिक नागरिक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)