…तर 150 रुग्णालये बंद पडणार!

नोंदणीकृत परिचारिकांचा मुद्दा 


राज्य शासनाच्या निर्णयाने फटका बसण्याची चिन्हे

पुणे- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी असलेल्या परिचारिकांनाच रुग्णालयामध्ये काम करता येईल. या राज्य सरकारच्या निर्णयामुळे आरोग्य क्षेत्रावर गंभीर संकट ओढावले आहे. नोंदणीकृत परिचारिका नसलेल्या रुग्णालयांची परवानगी रद्द केल्यास शहरातील तब्बल 150 लहान रुग्णालये बंद पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या विविध शाखांमधून प्रशिक्षण घेतलेल्या परिचारिका कार्यरत आहे. मात्र यातील केवळ एक तृतियांश परिचारिकांची कौन्सिलमध्ये नोंदणी आहे. शहरात लहान, मोठी मिळून जवळपास 650 रुग्णालये आहेत. यामध्ये लहान-मध्यम स्वरूपातील रुग्णालयांची संख्या 150 पर्यंत आहे. त्यामुळे साहजिकच राज्य शासनाच्या निर्णयामुळे रुग्णसेवा क्षेत्रात मनुष्यबळाचे संकट उद्‌भवण्याची भीती आहे.

नागरिकांवर वाढणार खर्चाचा बोजा
नोंदणीकृत परिचारिकांच्या अभावामुळे रुग्णसेवेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. लहान रुग्णालये बंद झाल्यास नाईलाजास्तव नागरिकांना मोठ्या, सुपरस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये जावे लागेल. यामुळे त्यांचा उपचाराचा खर्च वाढेल. तसेच या रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण वाढणार आहे.

मोठ्या रुग्णालयांच्या अडचणी वाढतील
परिचारिकांअभावी मान्यता रद्द झालेल्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार नाहीत. त्यामुळे साहजिकच या रुग्णांचा ओढा मोठ्या रुग्णालयांकडे जाईल. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढून मोठ्या रुग्णालयांवर कामाचा ताण वाढणार आहे.

नर्सिंग कौन्सिलची मान्यता असलेल्या परिचारिका आवश्‍यक त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. अनेक लहान-मध्यम रुग्णालये बंद पडण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास नागरिकांना मोठी अथवा सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल्समध्ये जावे लागेल. यातून सर्वसामान्यांवर खर्चाचा बोजा वाढणार आहे. कौन्सिलने यासंदर्भात निर्णयामध्ये शिथिलता आणण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
-डॉ. प्रकाश मराठे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखा


परिचारिकांच्या नोंदणीविषयी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत आरोग्य क्षेत्रातून अनेकांनी हरकती नोंदविल्या आहेत. या निर्णयामुळे होणारे परिणाम पाहता, राज्य शासनाने याविषयी योग्य मार्गदर्शन करावे, अशा आशयाचे पत्र महापालिकेडून राज्याच्या आरोग्य सचिवांकडे पाठविण्यात आले आहे. आता राज्यशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते, याची वाट पाहावी लागेल.
– डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य प्रमुख, महानगरपालिका

शहरातील एकूण रुग्णालये : 650
लहान-मध्यम रुग्णालये : 150
नोंदणीकृत परिचारिका : एक तृतीयांश

काय आहे नोंदणी प्रक्रिया :
– परिचारिकेचे अधिकृत प्रशिक्षण घेतल्यावर संस्थेचे सदस्य बनता येते.
– सदस्यत्वाची दर तीन ते पाच वर्षांनी पुनर्नोंदणी आवश्‍यक.
– ऑनलाइन पद्धतीने फॉर्म आणि पैसे भरायचे आहेत.

नोंदणीमधील अडथळे :
– अनेक वर्ष पुनर्नोंदणी न केल्याने दंडाची रक्‍कम जास्त.
– कौन्सिल प्रशासनाचा मनमानी कारभार.
– वेबसाइटमधील तांत्रिक अडथळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)