…तर विक्रेत्यांवर होणार फौजदारी

बंद कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याच्या विक्रेत्यांकडून हालचाली

पुणे – शिवाजी मार्केटमधील बंद कत्तलखाना सुरू करण्यावरून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि चिकन विक्रेत्यांमधील सातत्याने वाद सुरू आहेत. कत्तलखान्यातील सांडपाण्यामुळे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे नुकसान होत असल्याचे कारण देत, बोर्डातर्फे तुर्तास हा कत्तलखाना बंद केला आहे. मात्र, विक्रेत्यांकडून याचा वापर करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा बोर्डाने घेतला आहे.

शिवाजी मार्केट ही लष्कर परिसरातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. मार्केटमधील मांसविक्रेत्यांच्या सोयीसाठी सामाईक कत्तल खाना सुरू करण्यात आला होता. मात्र, मार्केटमधील स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीमुळे हा सील करण्यात आला होता. तसेच कोंढवा येथे कत्तलखान्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी बोर्डाच्या माजी सदस्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवाजी मार्केटमधील चिकन विक्रेत्यांनी हा कत्तलखाना पुन्हा सुरू केल्याचा आरोप बोर्ड प्रशासनाने केला आहे. त्यामुळे रक्ताचे पाणी नाल्यात जात असल्याने आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत कत्तलखाना पुन्हा सील केला आहे.

या वादाच्या पार्श्‍वभूमीवर बोर्डाच्या आरोग्य विभागाने हा कत्तलखाना पुन्हा सील केला असून भविष्यकाळात अतिक्रमण झाल्यास विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला आहे.

मार्केटच्या वेळेत सुरू ठेवण्याचा ठराव
बोर्डाच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार, मार्केटच्या वेळेत हा कत्तलखाना सुरू ठेवण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार बोर्डाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी हा कत्तलखाना सुरूच ठेवणे अपेक्षित आहे. त्यामुळे अतिक्रमण करण्याचा प्रश्‍नच येत नाही, तसेच याबाबत बोर्डाने पोलिसांत तक्रारही नोंदविली नाही, असा दावा बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मंजूर शेख यांनी केला आहे. मार्केटमधील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करा, पण कायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्यांना वेठीस धरू नका, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)