…तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला हातात हात घालूनच काम करावे लागेल

 पक्ष न पाहता कर्तृत्ववान व्यक्तीलाच संधी : शरद पवार

पुणे – राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसला हातात हात घालूनच काम करावे लागणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना पक्ष न पाहता कर्तृत्ववान व्यक्तीलाच संधी देण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

पुणे महापालिकेच्या वतीने तळजाई टेकडीवर बांधण्यात आलेल्या “कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम’चा लोकार्पण सोहळा शरद पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील, माजी क्रिकेटपट्टू चंदू बोर्डे, सदानंद मोहोळ, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.

एकेकाळी क्रिकेटरांच्या मार्गदर्शकांची पंढरी अशी पुणे शहराची ओळख होती. मात्र, ही ओळख आता पुसली गेली आहे अशी खंत व्यक्त करून पवार म्हणाले, हे स्टेडियम बांधून पुणे महापालिकेने एक चांगले काम केले आहे. परंतु त्याची सातत्याने देखभाल करण्याची जबाबदारीही पालिकेचीच असून त्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. क्रिकेट हा पूर्वी श्रीमंतांचा खेळ समजला जात होता. हे वास्तव असले तरी सध्याच्या परिस्थितीत गोरगरीबांची मुलेही या खेळामध्ये दैदिप्यमान अशीच कामगिरी करत आहेत. त्यामुळे ही गरज ओळखून पालिकेने केवळ स्टेडियम न बांधता त्यांच्यासाठी याठिकाणी सवलतीच्या दरात प्रशिक्षण केंद्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने स्वत: या मार्गदर्शकांना वेतन देण्याची गरज आहे. असे झाले तर पुण्यातून देशाला उत्तम क्रिकेटर मिळण्यास मदत होणार असून त्या माध्यमातून पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर जाण्यास मदत होणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, एकेकाळी देशाच्या क्रिकेट संघात मुंबईच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. त्यावेळी भारताच्या संघात मुंबईच्या किमान पाच ते सहा खेळाडूंचा भरणा होता. मात्र, आता हळूहळू ही परिस्थिती बदलत चालली आहे. आताच्या परिस्थितीत देशाच्या सर्व राज्याचे विशेषत: ग्रामीण भागातील उत्तम खेळाडू देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी काळातही ग्रामीण भागातून चांगले क्रिकेटपट्टू तयार होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत उपमहापौर डॉ. धेंडे यांनी केले. सुधीर गाडगीळ आणि प्राजक्ता माळी यांनी सूत्रसंचलन केले, नगरसेवक अविनाश बागवे यांनी आभार मानले.

माझीही विकेट तिथेच पडली…!
क्रिकेटपट्टू स्व. सदू शिंदे हे प्रतिभा पवार यांचे वडिल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सासरे होते. त्यांचा उल्लेख पवार यांनी त्यांच्या भाषणात केला. स्व. सदूभाऊ हे उत्तम लेगस्पिनर गोलदांज होते. त्यांना कमी सामने खेळायला मिळाले असले तरी त्यांनी अल्पकालावधीत भल्याभल्या फलदाजांना घाम फोडला होता. माझ्या व्यक्तीगत जीवनातही त्यांनीच माझी विकेट घेतली, अशी मिश्‍किल टिप्पणी शरद पवार यांनी करताच प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रतिभा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासह उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उडाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)